मतदारसंघ फेररचनेमुळे जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय समीकरणे बदलली

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जम्मू-काश्‍मीरमध्ये मतदारसंघांची फेररचना करण्यात आल्यामुळे राजकीय पक्षांना येथे उमेदवार देतानाही बदलती मतदारसंघांची रचना लक्षात घेऊन त्यानुसार उमेदवारांमध्ये बदल करावा लागला आहे. त्यामुळे येथील राजकीय समीकरणे देखील बदलली आहेत.

प्रमुख्याने काश्‍मीरमधील उमेदवारांची निवड करताना येथील पक्षांची तारांबळ उडाली आहे. उदाहरणार्थ पूर्वीच्या श्रीनगर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या उमर अब्दुल्ला यांनी यावेळी बारामुल्ला मतदारसंघातून अर्ज भरला आहे. त्याचप्रमाणे नव्याने तयार करण्यात आलेल्या अनंतनाग-राजौरी मतदारसंघातूनही अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सला उमेदवार बदलावा लागला. बदललेल्या मतदारसंघानुसार येथील गुज्जरांची मते लक्षात घेत गुज्जर नेते मियाँ अल्ताफ अहमद यांना येथून उमेदवारी दिली आहे.

जम्मू-काश्‍मीरमधील स्थानिक प्रशासनाने येथे २०२६ पर्यंत मतदार संघांची फेररचना करून नये असा निर्णय घेतला असताना देखील केंद्र सरकारने येथील मतदार संघांच्या फेररचनेसाठी आयोगाची स्थापना करून मतदार संघांची फेररचना केली. या आयोगाने काश्‍मीर विभागात सहा मतदारसंघ वाढविले तर जम्मूमध्ये एक मतदारसंघ वाढविला. लोकसभा मतदार संघांची संख्या मात्र सारखी ठेवली असली तरी त्यांची फेररचना केली आहे.

या फेररचनेमध्ये मतदारसंघांत नव्याने विविध भागांचा समावेश करण्यात आला आहे तर काही भाग गाळण्यात आले आहेत. लोकसभा असो अथवा विधानसभा प्रत्येक मतदारसंघाच्या सीमा जवळपास बदलण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ उत्तर काश्‍मीरमधील अनंतनाग-पुलवामा मतदारसंघात या आधी अनंतनाग, पुलवामा,कुलगान आणि शोपियाँ या जिल्ह्यांचा समावेश होता.
 
आता पुलवामा आणि शोपियाँ हे जिल्हे यातून वगळण्यात आले आहेत आणि राजौरी पूँच यांचा समावेश करून अनंतनाग पूँच मतदारसंघ तयार करण्यात आला आहे. तर पुलवामा आणि शोपियाँ हे जिल्हे श्रीनगर मतदारसंघात समाविष्ट करण्यात आले आहेत. तर आधीच्या श्रीनगर मतदारसंघातील बडगाम जिल्ह्याचा समावेश बारामुल्ला मतदारसंघात करण्यात आला आहे.