भारताच्या निवडणूकीत अमेरिकेचा हस्तक्षेप?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 10 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारतात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत अमेरिका हस्तक्षेप करत असल्याचा आरोप रशियाने केला होता. मात्र, अमेरिकेने रशियाचा हा आरोप फेटाळून लावला आहे. यावेळी अमेरिकेने म्हटले की, ते जगातील कोणत्याही निवडणुकीत हस्तक्षेप करत नाहीत. परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, निवडणुकीत काय करायचे याचा निर्णय भारतातील जनतेला घ्यायचा आहे.

परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "आमचा भारतातील निवडणुकांमध्ये कोणताही सहभाग नाही, कारण आम्ही जगात कोठेही निवडणुकांमध्ये स्वतःला सहभागी होत नाही. याचा निर्णय भारतातील जनतेला घ्यायचा आहे. 

दरम्यान भारतामध्ये सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत अमेरिका हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रशियाने केला होता.

अमेरिका भारताच्या अंतर्गत राजकारणात असंतुलन करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही रशियाने म्हटलं आहे. भारतातील सध्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचे तीन टप्पे पूर्ण झाले असताना रशियाकडून हे आरोप करण्यात आले आहेत. मतदानाचे आणखी चार टप्पे बाकी आहे.

यावेळी रशियाने खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या प्रकरणावरही भाष्य केले आहे. पन्नूच्या कथित हत्येच्या कटात भारतीय गुप्तचर अधिकारी सामील असल्याचा अमेरिकेचा आरोप रशियाने निराधार असल्याचे म्हटले आहे.

रशियन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, अमेरिकेने या प्रकरणात भारतीय नागरिकांच्या सहभागाचा कोणताही विश्वासार्ह पुरावा अद्याप सादर केलेला नाही. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भारताच्या धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिका सातत्याने बिनबुडाचे आरोप करत आहे, असे मारिया झाखारोवा म्हणाल्या होत्या. भारतातील अंतर्गत राजकीय परिस्थिती बिघडवणे आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अडथळे निर्माण करणे हा त्यांचा उद्देश आहे.

झाखारोवा पुढे म्हणाल्या की, अमेरिकेच्या कारवाया भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.