अमेरिकेने भारतावर लादलेल्या टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर आशियातील दोन प्रबळ आर्थिक सत्तांच्या नेत्यांमधील या बैठकीची दखल चीन आणि अमेरिकेतील प्रमुख माध्यम प्राधान्याने घेतली आहे. चिनी सरकारी माध्यमांनी या भेटीचा वृत्तांत पहिल्या पानांवर प्रसिद्ध केला असून दोन नेत्यांमधील ही चर्चा फलदायी आणि आणि दोन्ही देशांमधील संबंध सुरळीत होत असल्याचे लक्षण असल्याचे म्हटले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्यापार संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग आणि रशियन अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांच्याबरोबर मोदींच्या उपस्थितीतून वॉशिंग्टनला धोरणात्मक एकतेचा व्यापक संदेश दिल्याकडे अमेरिकेच्या माध्यमांनी लक्ष केंद्रित केले आहे.
चिनी माध्यमे म्हणतात...
चीनमधील सरकारी वृत्तपत्र 'चायना डेली'ने मोदी व जिनपिंग यांच्या भेटीला महत्त्व दिले आहे. 'या भागीदारीकडे भारत-चीन संबंधांची गुरुकिल्ली म्हणून पाहिले जाते' असे मथळा त्यांनी दिला आहे. 'प्रतिस्पर्धी नव्हे तर भागीदार' अशा भूमिकेतून दोन्ही देशांनी घेतली आहे, असे त्यात म्हटले आहे. 'ग्लोबल टाईम्स'ने त्सिंगुआ विद्यापीठातील 'नॅशनल स्ट्रॅटेजी इन्स्टिट्यूट'च्या संशोधन विभागाचे संचालक कियान फेंग यांच्याशी काल संवाद साधला.
"चीन-भारत संबंधांच्या दीर्घकालीन विकासासाठी धोरणात्मक परस्पर विश्वास पुन्हा निर्माण करणे, सीमाप्रश्न योग्यरीत्या हाताळणे आणि सहकार्य पुन्हा निर्माण करणे, अशा तीन प्रमुख आव्हानांचा सामना करावा लागणार आहे," असे फेंग म्हणाले. मोदी आणि शी जिनपिंग यांच्यातील बैठक फलदायी होती. असे मत 'सीपीसी'च्या केंद्रीय समितीच्या राजकीय ब्युरोच्या स्थायी समितीचे सदस्य काय क्वी यांनी व्यक्त केले.
अमेरिकी म्हणतात...
'ट्रम्प यांच्या टैरिफमुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या जगात जिनपिंग आणि मोदी यांनी मैत्रीचा संवाद,' असे शीर्षक देऊन 'सीएनएन'ने वृत्त दिले.
'ट्रम्पच्या शुल्कावरील संतापाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या जिनपिंग यांनी मोदी आणि पुतीन यांच्या परिषदेचे आयोजन केले,' अशा शीर्षकाखाली 'द टाईम'ने बातमी दिली आहे. 'वॉशिंग्टन पोस्ट'ने अमेरिकेच्या देशांतर्गत अशांततेवर लक्ष केंद्रित केले आहे. 'अमेरिकेच्या नेतृत्वाखालील व्यवस्थेविरुद्ध नेत्यांना एकत्र करण्यासाठी चीन ट्रम्प यांच्यावरील संतापाचा वापर करण्याचा प्रयत्न जिनपिंग करीत आहेत,' असे या वृत्तपत्राने म्हटले आहे. 'वॉल स्ट्रीट जर्नल'ने थेट बाजू मांडली आहे. 'तीन नेते एकत्र येणे हा अमेरिकेला संकेत आहे. सहकार्याची शपथ घेणारे चीन, रशिया, भारताचे नेते ट्रम्प यांना संदेश देत आहेत, असे त्यात म्हटले आहे.
अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान
'एससीओ' परिषद अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देऊ शकते आणि चीनच्या बहुध्रुवीय जगासंबंधी दृष्टिकोनाला बळ देऊ शकते, असे 'असोसिएटेड प्रेस' या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून रशिया भारताचा मोठा तेल पुरवठादार बनला आहे. यामुळे अमेरिकेशी तणाव वाढत आहे, असे मत वृत्तात व्यक्त केले आहे.