धुळे मतदारसंघ : मुस्लीम उमेदवारांच्या प्रभावाची कसोटी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 11 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भाजपच्या विजयात मतविभाजनाच्या डावपेचांचे बरेचसे योगदान असते. विशेषतः लोकसभेच्या धुळे मतदारसंघात काँग्रेसला रोखण्यासाठी भाजपकडून पडद्याआडून तसे डावपेच रचले जात असतात. ते काँग्रेसचे मताधिक्य कमी होण्यासाठी, तर भाजपचे मताधिक्क्य वाढीसाठी असतात. 

यंदा निवडणुकीत मतविभाजन करू शकणारे दोन प्रमुख पक्ष रिंगणाबाहेर असल्याने नशीब आजमावणाऱ्या सात मुस्लीम उमेदवारांच्या प्रभावाचीही कसोटी लागणार आहे. यामागचे डावपेच कुणाच्या पथ्यावर पडतात हे पाहणे औत्सुक्याचे असेल. मालेगाव मध्य, धुळे, सोनगीर, दोंडाईचा, नरडाणा येथील मुस्लीमबहुल भागावर काँग्रेसची अधिकतर भिस्त आहे. असे भाग वगळून भाजपचा प्रचार होत असतो.

या मतदारसंघात २००९ ला एकूण १५ उमेदवार होते. पैकी ७ उमेदवार मुस्लीम समाजाचे होते. याप्रमाणे २०१४ ला एकूण १९ उमेदवारांपैकी ११ मुस्लीम, २०१९ ला एकूण २८ उमेदवारांपैकी १३ मुस्लीम, तर यंदा २०२४ च्या निवडणुकीत एकूण १८ पैकी ७ उमेदवार मुस्लीम समाजाचे आहेत. राजकीय पटलावर हे उमेदवार भाजपने उभे केले की ते स्वतःहून रिंगणात आहेत हा चर्चेचा मुद्दा ठरतो आहे.

ताकदीवर निवडणूक
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम हे प्रमुख दोन पक्ष लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील रिंगणात नसल्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये सरळ लढत आहे. मुस्लीमबहुल भागातील अधिकाधिक मते आपल्याच पारड्यात पडतील, असा काँग्रेसला विश्‍वास आहे. या समाजाचे यंदा सात उमेदवार रिंगणात असताना ते कसे शक्य होते याकडे भाजपची नजर असेल. 

एकमेकांच्या राजकीय हालचाली, घडामोडींवर हे दोन पक्ष बारीक लक्ष ठेऊन आहेत. डावपेचाचा तो एक भाग असतो. रिंगणातील सात मुस्लीम उमेदवारांच्या माघारीसाठी फारसा कुणी जोर लावल्याचेही दिसून आले नाही. त्यातून भाजप- काँग्रेसने आपापल्या ताकदीवर निवडणूक लढवावी, असे ठरवून घेतले आहे.

प्रभावाची तर कसोटी
मतदारसंघातील निवडणुकीत २००९ आणि २०१४ ला काँग्रेसमध्ये असताना मातब्बर नेते अमरिशभाई पटेल, तसेच २०१९ ला काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी भाजपशी सामना केला. दोन्ही ताकदवर नेते असूनही त्यांना खासदारकी मिळू शकली नाही. मात्र, पंधरा वर्षांपासून एक गठ्ठा मतदानापुढे पुरून उरत भाजपने मतदारसंघावरील पकड ढिली होऊ दिलेली नाही. नेमका हाच धागा पकडून यंदा काँग्रेसमध्ये उमेदवार निश्‍चितीवरून धुसफूस झाली.

सर्व पातळीवरून ताकद लावूनही काँग्रेसला या मतदारसंघात पंधरा वर्षांपासून यश लाभू शकलेले नाही. त्यामुळे यंदा सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जावी, अशी मागणी काँग्रेसमधून जोरात होती. परंतु, या पक्षात मौलिक लढतीचा निर्णय पक्का असल्याने सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली गेली नाही. तसेच यासंबंधी वादावर नंतर सामंजस्याने पडदा टाकण्यात पक्ष नेत्यांना यश आले. अशा स्थितीत अन्य पक्षांचे व मुस्लीम समाजाचे उमेदवार स्वप्रभावाच्या कसोटीला उतरतात किंवा कसे ते निकालावेळी दिसेलच.