स्टेट बँकेला झाला 'इतक्या' हजार कोटींचा नफा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 10 d ago
स्टेट बँक
स्टेट बँक

 

भारतीय स्टेट बँकेने ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात २४ टक्क्यांनी वाढ नोंदवली असून, २०,६९८ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत बँकेने १६,६९५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. बँकेने प्रतिशेअर १३.७० रुपयांचा लाभांश घोषित केला आहे.

मार्च तिमाहीत बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता सुधारली असून, एकूण एनपीए गेल्या वर्षीच्या २.७८ टक्क्यांच्या तुलनेत २.२४ टक्क्यांवर आला आहे, तर निव्वळ ‘एनपीए’ गेल्या वर्षीच्या ०.६७ टक्क्यांच्या तुलनेत ०.५७ टक्क्यांवर आला आहे. मार्च तिमाहीत बँकेच्या कर्जव्यवसायाने आठ तिमाहीतील सर्वोत्तम वाढ नोंदवली असून,

एकूण आणि निव्वळ एनपीएमधील गुणोत्तराबाबतीतही ३६ तिमाहीतील नीचांकी पातळी गाठली आहे. बँकेच्या व्याजउत्पन्नातही वार्षिक १९ टक्क्यांनी वाढ होऊन ते १.११ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत ते ९२,९५१ कोटी रुपये होते.

कर्जाची वाढ वार्षिक १५.२४ टक्के असून, देशांतर्गत वाढ १६.२६ टक्के आहे. व्यावसायिक आणि कृषी कर्जे अनुक्रमे ११ लाख कोटी आणि तीन लाख कोटी रुपयांहून अधिक आहेत, असे बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. मार्च २०२४ तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्नही वाढले असून, वर्षभरापूर्वीच्या याच काळातील १.०६ लाख कोटी रुपयांवरून ते १.२८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर ऑपरेटिंग खर्च तुलनेने कमी झाला असून, ३०, २७६ कोटींवर गेला आहे.