अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 'अतार्किक' आयात शुल्कावर (Tariffs) अमेरिकेतूनच टीकेची झोड उठली आहे. न्यूयॉर्क विद्यापीठातील प्राध्यापक एडवर्ड प्राईस यांनी ट्रम्प प्रशासनाला हे शुल्क तात्काळ हटवून भारताची माफी मागण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, भारत-अमेरिका संबंध हे २१व्या शतकातील सर्वात महत्त्वपूर्ण संबंध असून, ते चीन आणि रशियाच्या जागतिक भूमिकेवर प्रभाव टाकतील.
एका विशेष मुलाखतीत बोलताना प्राईस म्हणाले की, भारताची वाढती शक्ती पाहता, अमेरिकेने ५० टक्के आयात शुल्क लादणे हे अनाकलनीय आहे. "हे शुल्क शून्यावर आणले पाहिजे आणि (या चुकीबद्दल) माफी मागितली पाहिजे," असे रोखठोक मत त्यांनी मांडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणात्मक भूमिकेचे कौतुक करताना प्राईस म्हणाले की, मोदी रशिया आणि चीनसारख्या देशांसोबत आपले पर्याय खुले ठेवत असले तरी, ते पूर्णपणे त्यांच्या बाजूने झुकलेले नाहीत. भारताची स्वतंत्र भूमिका पाहता तो कधीही चीनच्या प्रभावाखाली येणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ट्रम्प यांच्या पाकिस्तानमधील वैयक्तिक व्यावसायिक हितसंबंधांमुळे भारतासोबतच्या धोरणांवर परिणाम होत असल्याच्या आरोपांवर बोलताना, यावर निश्चितपणे भाष्य करणे अशक्य असल्याचे प्राईस यांनी नमूद केले. परराष्ट्र धोरणातील अनेक तज्ज्ञ या व्यापारी तणावामुळे दोन लोकशाही देशांमधील धोरणात्मक संबंधांवर होणाऱ्या नकारात्मक परिणामांबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.