फली नरिमन यांनी कायद्याच्या क्लिष्टतेला सामान्य माणसांच्या आकलनाच्या मर्यादेत आणताना त्याचा आशय प्रवाही बनवला, तर अमीन सयानी यांनी गाण्यांचे सुरेल जग आपल्या प्रवाही निवेदनाने चैतन्यदायी बनवले. दीर्घकाळ या दोघांनी आपापली क्षेत्रे गाजवली.
फली नरिमन आणि अमीन सयानी ही खरेतर दोन वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारी माणसे आणि ती क्षेत्रेही अशी की त्यांचा परस्परांशी कुठूनही, कसाही संबंध जोडता येत नाही. एक कायद्याचे क्लिष्ट तर दुसरे रेडिओचे चैतन्यदायी फली नरिमन यांनी कायद्याच्या क्लिष्टतेला सामान्य माणसांच्या आकलनाच्या मर्यादित आणताना त्याचा आशय प्रवाही बनवला तर अमीन सयानी यांनी गाण्यांचे सुरेल जग आपल्या प्रवाही निवेदनाने चैतन्यदायी बनवले. सुमारे सहा दशकांहून अधिक काळ आपापल्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या या दोघांनीही एकाच दिवशी जगाचा निरोप घेतला. दोघांनीही वयाची नव्वदी पार केली होती, हे आणखी एक मुद्दाम नमूद करण्याजोगे वैशिष्ट्य.
मूळचे रंगूनमध्ये जन्मलेले फली नरिमन यांचे बरेचसे शिक्षण मुंबईतच झाले. प्रशासकीय सेवेत जाण्याची वडिलांची इच्छा डावलून त्यांनी कायद्याचे क्षेत्र निवडले; परंतु ते प्रशासकीय सेवेत गेले असते तरी कायद्याच्या क्षेत्रात जे मानदंड त्यांनी तयार केले, तसेच तिथेही केले असते, याबाबत शंका वाटत नाही. घटनेच्या मूलभूत चौकटीवर अतूट विश्वास असलेले विधिज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. व्यवसायातील एकेक पायरी चढत १९७२ मध्ये ते अतिरिक्त सॉलिसिटर जनरल या पदावर पोहोचले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करताच त्याचा निषेध म्हणून पदाचा तडकाफडकी राजीनामा देणारे फली नरिमन केवळ बोलके सुधारक नव्हते. मनुष्यस्वभावानुरूप, न्यायाधीशांच्याकडून निकाल देताना चूक होऊ शकते, पण मूलतः आपले काम हे अन्याय-निवारणाचे आहे याचे भान त्यांनी ठेवायला हवे, असे त्यांचे मत होते.
भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर फली नरिमन यांनी युनियन कार्बाइड कंपनीचे वकिलपत्र घेतले होते. मात्र पीडितांची भयानक अवस्था पाहिल्यानंतर, आयुष्यात केलेली ती सर्वांत मोठी चूक असल्याची कबुली त्यांनी दिली. कबुली देऊनच ते थांबले नाहीत, तर या खटल्यात न्यायालयाबाहेर तडजोड घडवून आणताना पीडितांना भरपाई मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. नर्मदा पुनर्वसन प्रकल्पात गुजरात सरकारची बाजू मांडणा-या नरिमन यांनी ख्रिश्चनांवरील हल्ल्यांमुळे व्यथित होऊन ती केसही सोडली होती.
एखाद्या व्यक्तीच्या उक्ती आणि कृतीमध्ये किती साम्य असावे, याचे आधुनिक काळातील उदाहरण म्हणून फली नरिमन यांच्याकडे पाहता येईल. संसद आणि न्यायव्यवस्थेमधील सूक्ष्म रेषेसंदर्भात नरिमन यांनी केलेले विवेचन आजही दिशादर्शक ठरेल. विशेषतः घटनेचा अर्थ लावण्याचे अखेरचे ठिकाण आपण आहोत आणि त्याला जर कोणी आव्हान देत असेल तर न्यायपालिकेने खंबीरपणे पाय रोवून उभे राहिले पाहिजे, हे फली नरिमन यांचे विचार, आजच्या संदर्भात विशेष महत्त्वाचे आहेत.
अमीन सयानी यांनी कोट्यवधी भारतीयांचे भावविश्व व्यापून टाकले होते. दूरचित्रवाणीचा उदय झाला नव्हता आणि मोबाइल, इंटरनेट वगैरे गोष्टींची तर कल्पनाही केली जात नव्हती, अशा काळात रेडिओ हे भारतीयांच्या ज्ञान, मनोरंजन आणि माहितीचे प्रमुख माध्यम होते. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सगळ्या कट्ट्यांच्या केंद्रस्थानी रेडिओच असायचा. सरकारी कारभारात सगळे कसे अधिकाधिक रुक्ष बनवण्याचा प्रयत्न केला जात असताना सिलोन केंद्रावरून अमीन सायानी नावाचे चैतन्य अवतरले.
मराठी गाण्यांची 'आपली आवड' एकीकडे लोकप्रिय असताना दुसरीकडे सिलोन केंद्रावरून नवनवे प्रयोग होत होते. 'बिनाका गीतमाला' त्यातलीच एक दंतकथा घडवण्यात मोलाचा वाटा होता अमीन सयानी यांचा. गाणी सगळ्यांना आवडत असली तरी त्या गाण्यांच्या पुढेमागेही काही श्रोत्यांना खेचून घेणारे असायचे आणि तो अमीन सयानी यांचा आवाज असायचा. आजच्या रेडिओ जॉकींसारखी अखंड अर्थहीन बडबड करण्याची त्यांना गरज नव्हती, आणि त्यावेळची तशी मागणीही नव्हती. मोजके बोलून लक्ष वेधून घेतानाच गाण्यांचा प्रवाह खंडित न करता ते दोन गाण्यांमधला सुरेल धागा बनायचे.
चेहरा समोर नसलेल्या एकाच आवाजाने कोट्यवधी भारतीयांना एवढ्या दीर्घकाळ मोहिनी घालण्याचे हे केवळ भारतातीलच नव्हे, जागतिक पातळीवरील दुर्मीळ उदाहरण म्हणता येईल. आधी बिनाका आणि नंतर सिबाका गीत माला, 'एस कुमार्स का फिल्मी मुकदमा', 'संगीत के सितारों की महफिल', 'बोर्नविटा क्विज कांटेस्ट', 'सेरिडान के साथी' व 'यह मेरी जिंदगी थी' ही केवळ कार्यक्रमांची नावे नाहीत, तर अमीन सायानी यांनी लोकप्रिय बनवलेल्या नाममुद्रा आहेत.
महानायक अमिताभ बच्चन यांच्यानंतर तितकाच लोकप्रिय असलेला आवाज म्हणून अमीन सयानी यांचा उल्लेख करावा लागेल. घटनेच्या मूलभूत चौकटीच्या रक्षणासाठी आयुष्यभर झटणारे फली नरिमन आणि आपल्या खास शैलीने लोकप्रिय बनलेले अमीन सयानी हे दोघे खरे तर कोट्यवधी भारतीयांचे 'आतले आवाज' होते.
- विजय चोरमारे, ज्येष्ठ पत्रकार