कविताच बनली दिव्यांग सफरअलींची वाणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 14 d ago
कवि सफरअली इसफ
कवि सफरअली इसफ

 

महाराष्ट्राला साहित्याची उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे. या परंपरेला जपण्यात आणि वाढवण्यात मुस्लिम साहित्यिकांचे देखील मोठे योगदान आहे. यातीलच एक नाव म्हणजे सफरअली इसफ. सफरअली गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून  मराठीची साहित्यसेवा करत आहेत. महाराष्ट्रभर ते आपल्या कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. जन्मापासून अपंगत्व असूनही ही बाब त्यांनी  मराठीच्या साहित्यसेवेच्या आड येऊ दिली नाही. त्यांच्या कविता आणि त्यामागच्या प्रेरणा यांची ओळख करून देणारा हा लेख…   

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक छोट्या कुटुंबात कवी सफरअली इसफ जन्म झाला. सफरअली लहानपणापासून दिव्यांग आहेत. त्यामुळे त्यांच्या चालण्या-बोलण्यावर बऱ्याचशा मर्यादा येतात. साहित्याची कोणतीही पार्श्वभूमी नसताना सफरअली यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर मराठी साहित्यक्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 

चुलत बंधु अबूबकर यांच्या घरी रोज वर्तमानपत्रे यायची. शाळेतून आल्यावर वर्तमानपत्रे वाचण्याची गोडी लागली. मग शाळेतील वाचनालयात असलेली पुस्तके वाचण्याचा छंद लागला. वाचन करून सोडून न देता त्यावर चिंतन करणे हा त्यांचा नित्यनियम बनत होता. वाचनाची गोढी वाढत होती आणि कवि सफरअली यांना आता कविता सुचू लागली होती. शालेय जीवनापासूनच त्यांनी कविता रचायला सुरुवात केली. 

याच दरम्यान नववीत  असताना ज्येष्ठ साहित्यिक प्र. शी. नेरुळकर यांच्याशी त्यांची ओळख झाली. नेरुळकर यांच्यामुळे सफरअली यांची पहिली कविता छापून आली. तीही एका दिवाळी अंकात आणि त्यांच्या साहित्य प्रवासाला सुरुवात झाली.  

दहावी नंतर पुढील शिक्षणासाठी सफरअली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिथवली या आडबाजूच्या गावात आले. खारेपाटण गावातील शेठ नविनचंद्र मफतलाल ज्यु. कॉलेजला शिकत असताना ते आबा या नावाने परिचित असलेले कोर्ले येथील विद्रोही कवी आणि सम्यक चळवळीचे संस्थापक आ. सो. शेवरे यांच्या संपर्कात आले. आबांच्या विद्रोही कविता सफरअली यांना आकर्षित करत होत्या. आबांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने सफरअली यांची कविता प्रसवत गेली. आता त्यांच्या भावनांना शब्द मिळत होते आणि शब्दांना शब्दात गुंफून कविता बहरत होती.  

सफरआली यांच्या कवितेला आता गरज होती जागांची जिथे त्या छापल्या जातील. आरती मासिकाचे संपादक विद्याधर भागवत यांनी कवितेला जागा दिली आणि सफरअली यांच्या कविता आरती मासिकात प्रसिद्ध होऊ लागल्या. या कवितांमुळे  सफरअली यांना ओळख मिळू लागली.  

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिथयश कवी आणि मित्र अजय कांडर यांनी सफरअली यांचातील संवेदनशील कवी ओळखून त्यांनी त्यांच्या कवितेचे शब्द सांभाळले. आणि त्यांच्या कवितेला न्याय मिळवून दिला. अजय कांडर यांच्याच मार्गदर्शनाखाली कवितेला धुमारे फुटत गेले असे कवि सफरअली आवर्जून सांगतात.

भुकेल्या स्वातंत्र्याचे गीत

तेव्हा चूल पेटेल या आशेनं 
बघतलं चुलीकडे 
तर चुलच कळवळून म्हणू लागली,
'ये आजादी झूठी हैं 
देश की जनता भूखी हैं'
तेव्हा याच अश्रूभरल्या शोकगीताने 
कधीच शांत झाली होती चुलीतील 
आणि पोटातीलही आग 

या कवितेतून समाजाची सद्य परिस्थिति आणू व्यथा मांडण्याचे काम केले आहे.   

कविता ही स्वप्नरंजनात हरवलेली नसावी तर ती वास्तववादी व खरी असावी असे सांगतात. कवीच्या कवितेला कोणताही जातधर्म नसावा. कविता सर्वसामान्य माणसांच्या जगण्याचे प्रश्न मांडणारी असावी. शिवाय ती वाचताना वाचकाला विचार करायला भाग पाडणारी असावी. कवितेविषयीचे  असे सर्व बारकावे अजय कांडर यांच्यामुळे शिकायला मिळाल्याचे ते प्रामाणिकपणे सांगतात. इथूनच त्यांच्या कवितेचा खरा जन्म झाला. म्हणून प्रामुख्याने मुस्लिमेतर कवीमध्ये आ. सो. शेवरे आणि अजय कांडर यांच्यामुळे आपल्या कवितेची वैचारिक जडणघडण घडत गेली, असे सफरअली मानतात. 
 
 
सफरअली गेल्या ३५ वर्षांपासून साहित्यसेवा आहेत. मात्र या वर्षी त्यांचा पहिलावहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला.  'अल्लाह, ईश्वर' या नावाचा संग्रह  'दर्या प्रकाशन’ने प्रकाशित केला आहे. इतक्या दीर्घ कालावधीमध्ये त्यांनी मोजक्याच कविता लिहिल्या. रती, वा्डमय वृत्त, मुराळी यांसारख्या महत्वाच्या आणि दर्जेदार मराठी नियतकालिकांमध्ये  त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. 'दस्तक' रफीक सुरज संपादित ‘मुस्लिम मराठी कवींचा प्रातिनिधिक कवितासंग्रह आणि ‘सिंधुदुर्गातील आजची कविता’ या प्रातिनिधिक कवितासंग्रहातही त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.

विविध नामांकित, दर्जेदार दिवाळी अंकात, दैनिकात त्यांच्या कवितेला मनाचे स्थान मिळाले आहे. तसेच अ.भा.मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, कोकण मराठी साहित्य संमेलन आणि इतर साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यांनी सहभाग घेतला आहे. 

कवितेच्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवर भाष्य करणे, त्यांना वाचा फोडणे हेहा सफरअली यांचे वैशिष्ट्य आहे. ते  शब्दाचेच हत्यार करून आपल्या कवितेतून धर्ममार्तंडाच्या विकृत मनोवृत्तीवर प्रहार करण्याचे धाडस करतात. अल्पसंख्य समाजाचा जळजळीत वेदनेचा वास्तव दाह ते आपल्या कवितेतून मांडतात. माणुस म्हणून जगू पाहणाऱ्या सर्वांनीच मुस्लिमांची कोंडी समजून सांगण्याचा प्रयत्न त्यांची कविता करते. 

सफरअली यांची कविता ही खऱ्या अर्थाने अस्वस्थ असलेल्या अल्पसंख्यक समुदायचे  प्रतिनिधित्व करते. होय, मी मुसलमान आहे या कवितेत ते म्हणतात, 

होय,
मी मुसलमान आहे 
पण आधी सच्चा माणूस 
जो इथल्या गंगा, जमुना 
संस्कृतीशी एकरूप होऊनही,
जीवाच्या आकांताने सांगतोय 
की याच भूमितून 
उगवून आली आहे माझी नाळ

अन्याय, अत्याचारासोबतच दुःख, दारिद्र्य, बेकारीचे चटके सोसत असलेल्या, पदोपदी देशभक्ती सिद्ध करण्याच्या यातनाही सहन कराव्या लागणाऱ्या समुदायची घुसमट त्यांच्या कवितेतून व्यक्त होते. 

कवी सफरअली यांचा  चांगुलपणावरचा विश्वास कायम आहे. घृणा, तिरस्कार, उपेक्षा, द्वेष वाट्याला आले तरी त्यांनी  अखंड प्रेमाची गंगा- जमुना तहजीबची कास सोडलेली नाही.  कवी म्हणतो, 

सहिष्णू भूमीत

म्हणूनच म्हणतो की 
बघाच एकदाची माझ्या देहाची 
चिरफाड करून 
आणि होऊ द्या तपासणी 
माझ्या छिन्नविछिन्न काळजाचीही 
जिथे दिसेल तुम्हाला जाणीव 
आमच्या बंधुभावाची 
केवळ या असहिष्णू भूमीत 
एकोप्याने जगण्यासाठी!

भारतीयांना धर्माच्या आधारे एकमेकांपासून दूर करण्याचे प्रयत्न होत असताना  सफरअली यांच्या बहुतांश कविता सद्धभावनेची दुवा मागणाऱ्या, आणि अखंड मानवजातीला प्रेम आणि बंधुभाव यांच्या प्रवाहाशी जोडणाऱ्या आहेत. आणि हीच खरी  साहित्यसेवा नी देशसेवा असल्याचे कवी सफरअली इसफ सांगतात.

कवि सफरअली गेल्या तीस वर्षांपासून सातत्याने लिखाण करत आहेत. कवितेतून  सामाजिक प्रश्नांना व्यासपीठ देऊन त्यांना न्याय देण्याचा आणि सामाजिक सलोखा जपण्याचे काम करत आहेत.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter