अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसून पाकिस्तानने केलेल्या भीषण हवाई हल्ल्यांचा भारताने अत्यंत कठोर शब्दांत निषेध केला आहे. या हल्ल्यांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. तसेच, नागरी मालमत्तेचे खूप मोठे नुकसान झाले आहे. भारताने पाकिस्तानच्या या कृतीला थेट 'आक्रमकता' (Act of Aggression) म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावर भारताची अधिकृत भूमिका स्पष्ट केली.
"अफगाणिस्तानच्या हद्दीत पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारत तीव्र निषेध करतो. या हल्ल्यांमुळे अनेक सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि नागरी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत", असे रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानने नेहमीच अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाला विरोध केला आहे. या ताज्या हल्ल्यांमधून पाकिस्तानचा हाच शत्रुत्वाचा दृष्टिकोन पुन्हा एकदा समोर आला आहे.
"सार्वभौम अफगाणिस्तानच्या कल्पनेला विरोध करणाऱ्या पाकिस्तानी यंत्रणेची ही आणखी एक आक्रमक कृती आहे", अशा शब्दांत जयस्वाल यांनी पाकिस्तानला सुनावले.
पाकिस्तानने नुकतेच अफगाणिस्तानची राजधानी काबूल आणि इतर सीमावर्ती भागात मध्यरात्री हवाई हल्ले केले होते. या भ्याड हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. कंदाहार विमानतळ परिसरातील 'काम एअर' या खासगी विमान कंपनीच्या इंधन डेपोवरही बॉम्बफेक करण्यात आली. अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दुसरीकडे, पाकिस्तानने मात्र या हल्ल्यांचे समर्थन केले आहे. 'तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हे अचूक हल्ले केल्याचा दावा एका पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्याने केला आहे. 'टीटीपी'चे दहशतवादी अफगाणिस्तानात लपून बसले आहेत आणि तिथूनच ते पाकिस्तानमध्ये हल्ले करत आहेत, असा आरोप इस्लामाबादकडून वारंवार केला जातो.
पण काबूलमधील तालिबान सरकारने पाकिस्तानचे हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर इतर कोणत्याही देशावर हल्ले करण्यासाठी होऊ देणार नाही, असा दावा तालिबानने केला आहे.
काबूल पोलिसांचे प्रवक्ते खलील झद्रान यांनी या हल्ल्याची माहिती दिली.
"पाकिस्तानने थेट निवासी भागांवर बॉम्बफेक केली. यात सामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागला", असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अफगाणिस्तानचे सार्वभौमत्व आणि त्यांच्या प्रादेशिक अखंडतेचा पूर्ण आदर राखला गेला पाहिजे. भारताच्या या जुन्या आणि ठाम भूमिकेचा जयस्वाल यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला आहे. या हल्ल्यांमुळे दोन्ही शेजारी देशांमधील तणाव आता शिगेला पोहोचला आहे.