मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा जवळचा सहकारी पाकिस्तानात ठार!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
शेख युसूफ आफ्रिदी
शेख युसूफ आफ्रिदी

 

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा जवळचा सहकारी आणि लष्कर-ए-तैयबाचा (LeT) महत्त्वाचा नेता शेख युसूफ आफ्रिदी याची पाकिस्तानात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून साधारण २५० किमी अंतरावर असलेल्या खैबर भागातील लांडी कोटलमध्ये रविवारी ही घटना घडली. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी आफ्रिदीवर बेछूट गोळीबार केला आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती एका पोलीस सूत्राने सोमवारी पीटीआयला दिली. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या प्रादेशिक रचनेमध्ये आफ्रिदी हा एक मुख्य चेहरा मानला जात असे. खैबर पख्तुनख्वामध्ये दहशतवादी गटाच्या कारवायांचे नियोजन आणि नवीन तरुणांची भरती करण्यात त्याची मोठी भूमिका होती.

या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आफ्रिदीच्या हत्येस जबाबदार असलेल्यांना पकडण्यासाठी स्थानिक प्रशासनाने तपास सुरू केला आहे. सईदच्या बंदी घातलेल्या जमात-उद-दावा (JuD) च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आफ्रिदी हा खैबरमधील झाखाखेल टोळीचा एक प्रसिद्ध धार्मिक विद्वान होता आणि 'अहले-हदीथ' (सलाफी) विचारसरणीचा प्रमुख अभ्यासक म्हणून ओळखला जात असे. अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला आणि ते घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. सध्या 'ख्वारीज' (तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान) सारख्या कट्टरपंथी गटांना सलाफी विद्वानांकडून वैचारिक आणि व्यावहारिक स्तरावर मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे, असेही या अधिकाऱ्याने नमूद केले.

गेल्या आठवड्यात लाहोरमध्ये लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक नेता अमीर हमजा याच्यावरही जीवघेणा हल्ला झाला होता. त्यामध्ये तो जखमी झाला होता. हाफिज सईद नंतर हमजा हा लष्करचा दुसरा सर्वात महत्त्वाचा नेता मानला जातो. हाफिज सईद स्वतः २०१९ पासून दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात शिक्षा भोगत आहे.