३७० रुपयांची बिर्याणी अन् आक्षेपार्ह वक्तव्य; स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरेवर महाराष्ट्र सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरे
स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरे

 

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरे, हिमांशू जांगडा आणि इतरांविरुद्ध सोशल मीडियावर अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुरुग्राम येथे झालेल्या एका कॉमेडी शोदरम्यान महिलांबद्दल करण्यात आलेल्या अत्यंत आक्षेपार्ह आणि संमतीला (Consent) क्षुल्लक ठरवणाऱ्या वक्तव्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी सर्वांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

'३७० रुपयांची बिर्याणी' आणि संतापजनक वक्तव्य

सायबर पोलिसांच्या नोडल पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणीत मोरे होस्ट करत असलेल्या शोचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यातील एका व्हिडिओमध्ये हिमांशू जांगडा याने एका तरुणीसोबत डेटवर असताना ३७० रुपयांची चिकन बिर्याणी खाऊ घातल्याचा किस्सा सांगितला होता. त्यानंतर तरुणीने घरी सोडायला सांगितल्यावर, जांगडा याने बिर्याणीवर केलेल्या खर्चाच्या बदल्यात शारीरिक संबंधांची मागणी केल्याचे म्हटले होते. यावर प्रणीत मोरे हसताना दिसला होता. या वक्तव्यातून महिलांना अत्यंत अपमानास्पद पद्धतीने दाखवण्यात आले असून त्यांच्या संमतीची खिल्ली उडवण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

वैद्यकीय मृतदेहांबाबतही आक्षेपार्ह टिप्पणी

याच शोच्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये डॉ. सेजल पवार हिने वैद्यकीय शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या मृतदेहांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि मानहानीकारक टिप्पणी केली होती. मृतांच्या प्रतिष्ठेचा हा घोर अपमान असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. केवळ व्ह्यूज मिळवण्याच्या उद्देशाने हे वादग्रस्त व्हिडिओ युट्यूब आणि इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आले होते. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) संबंधित कलमांखाली प्रणीत मोरे, हिमांशू जांगडा, डॉ. सेजल पवार आणि इतर अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांना अधिकृत जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राष्ट्रीय महिला आयोगाकडूनही दखल

सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर मोरे आणि जांगडा यांनी माफी मागितली होती, तसेच जांगडाने आपले इन्स्टाग्राम अकाउंटही बंद केले आहे. मात्र, राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) या प्रकरणाची स्वतःहून (सुओ मोटो) दखल घेत दोघांना समन्स बजावले आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी हरियाणाच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून त्वरित कारवाईची आणि सात दिवसांत अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नागरिकांना असे वादग्रस्त व्हिडिओ शेअर न करण्याचे आवाहन केले असून, अश्लील मजकूर पसरवल्यास कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.