महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत ८७.७९ टक्के मतदारांना गणती फॉर्म्सचे वाटप करण्यात आले असून त्यापैकी ६०.४४ टक्के फॉर्म्सचे डिजिटायझेशन (संगणकीकरण) पूर्ण झाले आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
१ लाखांहून अधिक बीएलओ कार्यरत
राज्यातील एकूूण ९,७८,५४,०४९ मतदारांपैकी तब्बल ८,५९,०५,००५ मतदारांना enumeration फॉर्म्स देण्यात आले आहेत, तर ५,९१,४२,६२४ फॉर्म्सचे यशस्वीपणे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. ३० जून ते ८ ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या मोहिमेसाठी राज्यात १ लाखांपेक्षा जास्त बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) प्रत्यक्ष काम करत आहेत.
हिंगोली वाटपात तर रत्नागिरी डिजिटायझेशनमध्ये अव्वल
फॉर्म वाटपामध्ये हिंगोली जिल्ह्याने ९९.९८ टक्क्यांसह प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यापाठोपाठ जळगाव (९९.९१%), बुलढाणा (९९.८१%), अमरावती (९९.७७%), वर्धा (९९.७६%) आणि सिंधुदुर्ग (९९.७३%) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. तर डिजिटायझेशनच्या कामात ८६.०३ टक्क्यांसह रत्नागिरी जिल्हा आघाडीवर आहे. त्याखालोखाल यवतमाळ (८५.२०%), बुलढाणा (८२.६६%), हिंगोली (८२.६३%), परभणी (८१.९४%), गडचिरोली (८०.८४%) आणि चंद्रपूर (८०.०२%) यांचा समावेश आहे.
शहरी भागांतील स्थिती
प्रमुख शहरी जिल्ह्यांचा विचार केल्यास, ठाण्यात ६७.९७ टक्के वाटप आणि २७.५६ टक्के डिजिटायझेशन, मुंबई उपनगर जिल्ह्यात ६७.७९ टक्के वाटप आणि २८.७२ टक्के डिजिटायझेशन, मुंबई शहरात ७२.३७ टक्के वाटप आणि ३८.८८ टक्के डिजिटायझेशन, तर पुण्यात ७० टक्के वाटप आणि ४५.०४ टक्के डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. नाशिकमध्ये ८५.७८ टक्के वाटप आणि ५७.८८ टक्के डिजिटायझेशन तर पालघरमध्ये ७९.७३ टक्के वाटप आणि ३९.९५ टक्के डिजिटायझेशन झाले आहे.
मतदार याद्यांचे प्रमाणीकरण करणे, पात्र मतदारांची नावे समाविष्ट करणे, दुबार किंवा अपात्र नावे वगळणे आणि आगामी निवडणुकांसाठी अद्ययावत मतदार यादी तयार करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.