नवी दिल्ली
नीट परीक्षेतील अनियमितता आणि पेपर लीक प्रकरणाविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला बॉलिवूडमधून आणखी मोठा पाठिंबा मिळाला आहे. अभिनेता शाहिद कपूर, दिया मिर्झा, मलायका अरोरा आणि सुमीत राघवन यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे समर्थन करत त्यांना प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे म्हटले आहे.
कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेतृत्वात सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईवर कलाकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेता शाहिद कपूरने इन्स्टाग्रामवर लिहिले की, शिक्षण प्रणाली ज्यांच्यासाठी आहे, जर त्यांचाच त्यावर विश्वास राहिला नाही तर काय होईल? आज ते प्रश्न विचारत आहेत आणि त्यांना हा अधिकार आहे. देशातील तरुण हेच देशाचे भविष्य आहेत, त्यामुळे त्यांना आपले मत मांडण्याचा पूर्ण हक्क आहे.
अभिनेत्री दिया मिर्झा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या वेदनेबद्दल साधी सहानुभूतीही दाखवण्यात आली नाही. अभिनेता विवान शाह यानेही मुंबईतील आंदोलनात सहभागी होत पंतप्रधानांची प्रतिक्रिया अपुरी असल्याचे म्हटले आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
नारो फतेही, हर्षवर्धन राणे आणि सुमीत राघवन यांनीही विद्यार्थ्यांच्या धैर्याचे कौतुक केले असून, शिक्षणात पारदर्शकता आणि न्याय मिळायला हवा, अशी भूमिका मांडली आहे.