PAPER LEAK PROTEST: विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहिला सलमान खान, आंदोलनाला राजकारणापासून दूर ठेवण्याचे आवाहन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 d ago
पेपर लीकविरोधी विद्यार्थी आंदोलनाला अभिनेता सलमान खानचा पाठिंबा
पेपर लीकविरोधी विद्यार्थी आंदोलनाला अभिनेता सलमान खानचा पाठिंबा

 

मुंबई:

देशभरात सुरू असलेल्या पेपर फुटीच्या (Paper Leak) संतापजनक घटना आणि त्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची आता बॉलिवूडमध्येही गंभीर दखल घेतली जात आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याने पेपर फुटीच्या मुद्द्यावर स्पष्ट आणि रोखठोक भूमिका घेत देशातील विद्यार्थ्यांच्या लढ्याला आपला पाठिंबा दर्शवला आहे. "हा प्रश्न केवळ विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेतील आहे, त्यामुळे या आंदोलनावर कुणीही राजकीय पोळ्या भाजू नयेत," असा स्पष्ट इशारा सलमानने दिला आहे.

आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक सविस्तर पोस्ट शेअर करत सलमानने शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि भारताचे भवितव्य यावर परखड मते मांडली आहेत.

काय म्हणाला सलमान खान आपल्या पोस्टमध्ये?

सुरुवातीलाच सलमानने आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तो म्हणाला, "हे आंदोलन अत्यंत शांततापूर्ण मार्गाने सुरू होते. मात्र, त्याला हिंसक वळण लागल्याचे पाहून मला तीव्र दुःख झाले. या संपूर्ण प्रकारात दुखापतग्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांसोबत आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या सहवेदना आहेत."

पेपर फुटीसारख्या गंभीर समस्येवर आवाज उठवण्यासाठी देशातील तरुण आणि त्यांचे पालक ज्या प्रकारे एकत्र आले आहेत, त्याचे सलमानने भरभरून कौतुक केले आहे. "चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी विद्यार्थ्यांनी दाखवलेले हे धाडस आणि प्रामाणिकपणा खरोखरच कौतुकास्पद आहे. शांततापूर्ण मार्गाने न्याय मागणारी ही नवी पिढी अत्यंत शूर आहे. शिक्षणाप्रती समर्पित असणारी हीच पिढी भविष्यात भारताची मान गर्वाने उंचावेल," असा सार्थ विश्वास त्याने व्यक्त केला.

या पोस्टमधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय हस्तक्षेपाला केलेला विरोध. सलमानने स्पष्ट केले की, "हा थेट विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्था यांच्यातील प्रश्न आहे. त्यामुळे हे आंदोलन राजकीयदृष्ट्या 'हायजॅक' केले जाऊ नये. या लढ्याचं संपूर्ण श्रेय केवळ आणि केवळ देशातील विद्यार्थ्यांनाच मिळायला हवं. मला खात्री आहे की सरकारही या तरुणांना पूर्ण पाठिंबा देईल आणि आपली शिक्षण व्यवस्था अधिक भक्कम करेल. हा सर्वांच्याच फायद्याचा (win-win) निर्णय असेल."

हेही वाचा: आंदोलनाला बॉलिवूडचा पाठिंबा; दिया मिर्झासह अनेक दिग्गज कलाकार एकवटले

शिक्षणाबाबतचा आपला दृष्टिकोन मांडताना सलमानने एका नव्या 'ट्रेंड'ची संकल्पना मांडली. "शिक्षण हा आता देशातील नवा 'ट्रेंड' आणि 'फॅशन' व्हायला हवी. ही फॅशन दरवर्षी अधिकाधिक लोकप्रिय झाली पाहिजे. इतकी की, परदेशातील विद्यार्थ्यांनी भारतात शिक्षणासाठी यावे आणि आपला देश शिक्षणाचे जागतिक केंद्र (Educational Hub) बनेल," अशी आशा त्याने व्यक्त केली.

लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असलेल्या या संवेदनशील विषयावर एका सुपरस्टारने सकारात्मक बळ दिले आहे.