PAPER LEAK PROTEST: सचिन तेंडुलकर, शुभमन गिल आणि अभिनव बिंद्रा यांचे विद्यार्थी आंदोलनाला समर्थन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 8 h ago
 सचिन तेंडुलकर, शुभमन गिल आणि अभिनव बिंद्रा
सचिन तेंडुलकर, शुभमन गिल आणि अभिनव बिंद्रा

 

नवी दिल्ली

परीक्षांमधील वारंवार होणाऱ्या पेपर लीक प्रकरणाविरोधात देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता क्रीडा जगतातूनही मोठा पाठिंबा मिळाला आहे. क्रिकेट जगतातील दिग्गज सचिन तेंडुलकर आणि भारताचा कसोटी व एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल यांच्यासह ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे समर्थन केले असून, त्यांच्या व्यथा समजून घेण्याचे आवाहन केले आहे.

माजी क्रिकेटपटू इरफान पठाण, मोहम्मद कैफ आणि पॅरिस ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकर यांनीही याआधी विद्यार्थ्यांच्या बाजूने आपले मत मांडले आहे. नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांमुळे आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांमुळे संताप व्यक्त होत असताना खेळाडूंनी यावर चिंता व्यक्त केली आहे.

दिग्गजांची स्पष्ट भूमिका

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर म्हटले आहे की, जी समाजव्यवस्था कष्टापेक्षा परिणामांना प्राधान्य देते, ती गुणवत्तेऐवजी शॉर्टकट शोधते. आज जेव्हा विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज होत नाही, तेव्हा त्यांची निराशा समजण्यासारखी आहे. अशी परिस्थिती पुन्हा कधीही उद्भवू नये यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, असे त्यांनी नमूद केले.

कर्णधार शुभमन गिलने शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल आदराची भावना व्यक्त केली. भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांनी शिक्षण प्रणालीने तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे, असे म्हटले. युवा ग्रँडमास्टर निहाल सरिन यानेही पेपर लीकसारख्या गंभीर समस्यांवर पडदा टाकणे अयोग्य असल्याचे सांगत, जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ आणि इरफान पठाण यांनीही विद्यार्थ्यांवर होणाऱ्या लाठीहल्ला आणि त्यांच्या कष्टावर पाणी फेरल्या जाण्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.