भक्ती चाळक
राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या काही दिवसांपासून हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश सुरू आहे. राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या नीट (NEET) आणि शिक्षक पात्रता परीक्षांसारख्या (TET) अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीचे प्रकरण, निकालांमधील अनाधोंदी आणि पारदर्शकतेचा अभाव यांमुळे देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत.
अहोरात्र चालणाऱ्या या आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार निर्माण झाल्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. या संपूर्ण अनाधोंदीची आणि निष्काळजीपणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, ही या विद्यार्थ्यांची मुख्य आणि आग्रही मागणी आहे.
दिल्लीत पेटलेल्या या संघर्षाची धग आता केवळ राजधानीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तिचे लोण संपूर्ण देशभरात पसरले आहे. याच आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या आवाजाला बळ देण्यासाठी महाराष्ट्रातही मोठा लढा उभारला गेला आहे.
गुरुवारी अहमदनगर शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलाच्या आवारात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ ८८ वर्षांचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्वतः मैदानात उतरून आंदोलनाला सुरुवात केली.
तब्बल ६ वर्षांनंतर मौन आंदोलन
गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी येथून नगर शहरात आगमन झाले. त्यांनी सर्वात आधी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले आणि शांततेच्या मार्गाने आपले मौन आंदोलन सुरू केले. अण्णांनी तब्बल सहा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मौन व्रत धारण केले आहे. यापूर्वी २०१९ मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राळेगणसिद्धी येथे मौन आंदोलन केले होते.
काही दिवसांपूर्वीच माहिती अधिकार कायद्याच्या नियमावलीत राज्य सरकारने केलेल्या बदलांविरोधात अण्णांनी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, आंदोलन सुरू होण्याच्या दोन दिवस आधीच सरकारने त्या नियमावलीला स्थगिती दिल्याने ते आंदोलन टळले होते. मात्र, आता दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेला प्रसंग आणि परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ पाहता अण्णांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचे ठरवले आहे.
अण्णा हजारे यांच्या चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते ॲड. श्याम आसावा, ॲड. कारभारी गवळी, दीपक पापडेजा, संदीप कुसळकर आणि सुधीर भद्रे यांनी उपस्थित राहून या आंदोलनाची पार्श्वभूमी उपस्थितांसमोर विशद केली. तसेच राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर, अशोक मासाळ आणि विलास पेद्राम यांनीही आंदोलनस्थळी दाखल होत अण्णा हजारे आणि विद्यार्थ्यांना सक्रिय पाठिंबा दर्शवला.
पंतप्रधान मोदींना पत्र
नगरमध्ये आंदोलनाला बसण्यापूर्वी अण्णा हजारे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी स्पष्ट मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. तसेच दिल्लीत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेबद्दल अण्णांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात अण्णा हजारे म्हणाले की, “लोकशाहीत जनतेचा आवाज दडपून नव्हे तर संवादातून प्रश्न सोडवावा. विद्यार्थी व पालक मागील २५ दिवसांपासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. उत्तरदायित्व म्हणून एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याने सरकारची सत्ता जाणार नाही. उलट मंत्र्यांना संदेश जाईल की खात्याचा कारभार नीट केला नाही तर पदावरून दूर केले जाईल. यामुळे सरकारचा कारभार अधिक चांगला होईल.”
लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून बळाचा वापर करून हलवण्यात आल्याच्या घटनेवरही अण्णांनी पत्रात भाष्य केले होते. कोणतीही पूर्वचर्चा न करता बळाचा वापर करणे आणि दिल्लीत एवढे दिवस आंदोलन सुरू असतानाही सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने विद्यार्थ्यांशी चर्चा न करणे ही लोकशाहीत अत्यंत अयोग्य बाब असल्याचे अण्णांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
राजकीय पटलावर हलचाली
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून दिल्लीतील या आंदोलनाचे पडसाद संसदेच्या पटलावरही उमटू लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या संपूर्ण परिस्थितीवर अत्यंत सावधगिरीने पावले टाकत आहेत. २०११ मध्ये अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ (आयएसी) आंदोलनामुळे तत्कालीन सरकारला मोठा राजकीय फटका बसला होता. त्या आंदोलनाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष रणनीती आखत आहेत.
विरोधी पक्षांनी विशेषतः काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, तर आपनेही दिल्लीतील रस्त्यांवर उतरून विद्यार्थ्यांच्या बाजूने आवाज उठवला आहे.
सोनम यांचे उपोषण मागे तरीही विद्यार्थ्यांचा लढा सुरूच
गेल्या २५ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांनी अखेर २६ व्या दिवशी मध्यरात्री उपोषण मागे घेतलं. मध्यरात्री उपोषण मागे घेतल्यानंतर आंदोलनस्थळी मात्र याबाबतची माहितीच पोहोचली नव्हती. जंतर-मंतर येथे फोन जॅमर बसवण्यात आल्याने ही बातमी पोहोचायला वेळ लागला.
आंदोलन क्षेत्राच्या दीड किमी परिसरात मोबाईल डेटा ब्लॉक केल्यामुळे, अनेक समर्थकांना या घडामोडीची माहिती हा परिसर सोडल्यानंतरच मिळाली. आंदोलनस्थळी आलेला अवीक नावाचा विद्यार्थी म्हणाला, “आम्ही जेवण्यासाठी जामा मशिदीकडे गेलो होतो. तिथे आम्हाला नेटवर्क मिळालं आणि वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याचं समजलं. त्यानंतर आम्ही परत आलो.” इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलंय.
आंदोलनाची पुढील दिशा
दरम्यान, सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याचं समजातच आंदोलकांनी सुटकेचा निश्वास सोडला, पण आंदोलनस्थळ सोडलं नाही. आता आंदोलकांचे पुढील पाऊल काय असावं यावर सर्वांचे लक्ष लागून आहे. कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके याने आंदोलनाच्या पुढील वाटचालीबद्दल प्रतिक्रिया दिली.
अभिजित म्हणाले, “सोनम सरांनी २६ दिवसांनंतर आपले उपोषण संपवल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आणि बरे वाटले आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांच्या विलक्षण धैर्याबद्दल आणि त्यागाबद्दल त्यांचे मनापासून आभार. स्वतःच्या जीवाची बाजी त्यांनी संपूर्ण राष्ट्राची सद्सद्विवेकबुद्धी जागृत केली. त्यांचे जीवन या देशासाठी खूप मौल्यवान आहे.”
तो पुढे म्हणाले की, “जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत जंतर मंतर येथील कॉकरोच जनता पार्टीचे शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहील.”
सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं असलं तरी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. काहींच्या मते आता लक्ष प्रधान यांच्या राजीनाम्यावरून हटून उत्तरदायित्वाच्या व्यापक मागणीवर केंद्रित झालं आहे. तर इतरांच्या मते मूळ मागण्या अजूनही बदललेल्या नाहीत.