जोधपूर
भारतीय भूमीवरून प्रथमच जपानी लढाऊ विमानांचे संचालन सुरू झाले असून, हा भारत आणि जपानमधील संरक्षण सहकार्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड असल्याचे वायुसेना प्रमुख ए. पी. सिंह यांनी रविवारी सांगितले. जोधपूर येथील हवाई दल तळावर ९ ते २२ सप्टेंबर दरम्यान सुरू असलेल्या द्विपक्षीय हवाई सरावादरम्यान ते बोलत होते.
या संयुक्त सरावात भारतीय हवाई दलाची अत्याधुनिक विमाने जसे की स्वदेशी 'तेजस', सु-३०एमकेआय आणि राफेल यांच्यासह जपानच्या हवाई आत्मरक्षा दलाची (JASDF) एफ-२ए लढाऊ विमाने सहभागी झाली आहेत.
'वीर गार्डियन-२०२६' (Veer Guardian-2026) या भारत-जपान द्विपक्षीय हवाई सरावाचा एक भाग म्हणून, जपानी हवाई दल प्रमुख जनरल ताकेहिरो मोरीता यांनी पायलसोबत तेजस विमानाची सफर केली, तर वायुसेना प्रमुख ए. पी. सिंह यांनीही तेजस विमानातून स्वतंत्रपणे (सोलो) उड्डाण केले. या ऐतिहासिक प्रसंगानंतर दोन्ही देशांच्या हवाई दल प्रमुखांनी बॅजची अदलाबदल करत परस्पर आदर आणि भागीदारीचे प्रदर्शन केले.
प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना ए. पी. सिंह म्हणाले की, जपानी विमाने प्रथमच भारतीय भूमीवरून उड्डाण करत आहेत, जो आमच्या संबंधांमधील एक महान टप्पा आहे. अशा सरावांमुळे दोन्ही देशांना एकमेकांच्या ऑपरेशनल पद्धती समजून घेण्यास आणि क्षमता वाढवण्यास मदत होते.
जपानी हवाई दल प्रमुख मोरीता यांनी तेजस विमान हे भारताच्या तांत्रिक नवोपक्रमाचे आणि 'मेक इन इंडिया'चे प्रतीक असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, हा अनुभव केवळ अमूल्य नसून दोन्ही देशांमधील दशकांपासून जुन्या विश्वासाची साक्ष देतो. या १४ दिवसांच्या सरावादरम्यान दोन्ही देश प्रगत ऑपरेशनल मिशन्स, मिशन प्लॅनिंग, अभियांत्रिकी आणि एरोस्पेस सुरक्षेवर सखोल चर्चा करत आहेत.