रुरकी:
भारताची अर्थव्यवस्था आगामी २० वर्षांत सध्याच्या ४.०१५ ट्रिलियन डॉलरवरून थेट ३८ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल, असा विश्वास राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी व्यक्त केला आहे. आयआयटी रुड़कीच्या (IIT Roorkee) दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना त्यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याबद्दल आणि आर्थिक वाढीबद्दल महत्त्वपूर्ण भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंतच्या कालावधीला 'अमृतकाळ' म्हणून संबोधले असून, हा काळ खऱ्या अर्थाने देशाच्या परिवर्तनाचा काळ असल्याचे डोवाल म्हणाले. विद्यार्थी अशा परिवर्तनशील युगात जगत आहेत, जिथे त्यांचे भविष्य अत्यंत आशादायक आहे. देशात मोठ्या बदला होत असून भारत एका भव्य भविष्याकडे वाटचाल करत आहे, असे त्यांनी नमूद केले. यावेळी विद्यार्थ्यांना जीवनात संकटांचा सामना करण्यासाठी धाडशी बनण्याचे आवाहन त्यांनी केले. भगवान रामाचे उदाहरण देत त्यांनी ऋषी विश्वामित्रांनी राक्षसांच्या संहारासाठी रामाची निवड त्यांच्या धाडसी स्वभावामुळेच केल्याचे सांगितले.
सिक्कीममधील आपल्या सुरुवातीच्या नोकरीच्या दिवसांतील एक प्रसंग सांगत त्यांनी एका शेर्पाकडून शिकलेले यशाचे तीन मंत्र विद्यार्थ्यांसोबत शेअर केले. नकाशावर आपण कुठे उभे आहोत हे माहीत असणे, आपल्याला कुठे जायचे आहे हे ठाऊक असणे आणि तिथे जाण्याचा व परत येण्याचा मार्ग माहीत असणे, हे यशासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.