AIMIM Chief Asaduddin Owaisi: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ओवेसींचे युतीचे संकेत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 15 m ago
 एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी
एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी

 

कानपूर

उत्तर प्रदेशात सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाला (भाजप) सत्तेत येण्यापासून रोखू इच्छिणाऱ्या पक्षांसोबत युती करण्यासाठी आपली पार्टी तयार असल्याचे एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी स्पष्ट केले. कानपूरच्या कॅन्टोन्मेंट मतदारसंघात एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी राज्यातील मुस्लिमांना विधानसभेत हक्क मिळवून देण्यासाठी पक्षातर्फे एकत्र येण्याचे आवाहन केले.

२ ऑक्टोबरनंतर युतीबाबत निर्णय

या सभेत बोलताना ओवेसी म्हणाले की, आम्हालाही यूपीमध्ये तिसऱ्यांदा भाजपचे सरकार नको आहे. जर तुम्हाला भाजपला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखायचे असेल, तर पुढे या आणि एआयएमआयएमसोबत हातमिळवणी करा. हैदराबादचे खासदार असलेल्या ओवेसी यांनी स्पष्ट केले की, त्यांची पार्टी २ ऑक्टोबरपर्यंत वाट पाहिल आणि त्यानंतर आवश्यक वाटल्यास युतीची अधिकृत घोषणा केली जाईल.

बिहार निवडणुकांचा संदर्भ देत ते म्हणाले की, यापूर्वीही आम्ही युती अंतर्गत केवळ सहा जागांवर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र त्या बदल्यात आमच्यावर खोटे आरोप लादले गेले.

समाजवादी पक्षावर कडक टीका

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधताना ओवेसी यांनी उपस्थितांना विचारले की, तुमचे अखिलेश 'भय्या' सत्तेत असताना किती दंगली झाल्या? २०१३ च्या मुझफ्फरनगर दंगलीचा उल्लेख करत त्यांनी हजारो लोक विस्थापित झाल्याचे सांगितले आणि त्यावेळच्या सप सरकारमधील मुस्लिम प्रतिनिधित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

तसेच, राज्यातील मागील सर्वच सरकारे मुस्लिमांचे सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुका जवळ आल्या की अनेकजण जुनी भीती दाखवून मतांचे राजकारण करतात, अशी टीका त्यांनी केली. याशिवाय मशिद-मदरशांवरील कारवाईवरून भाजप सरकारला धारेवर धरत स्वातंत्र्यलढ्यात मुस्लिम धर्मगुरूंच्या योगदानाची आठवण करून दिली.