भोपाळ
भारताची प्रगती केवळ आर्थिक किंवा भौतिक विकासापुरती मर्यादित न राहता ती संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी असावी, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सहसरकार्यवाह दत्तात्रेय हसबोले यांनी रविवारी केले. भोपाळ येथील लाल परेड मैदानावर स्वयंसेवकांच्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे देशाचा जागतिक स्तर उंचावल्याचे अधोरेखित केले.
भारताची ५ हजार वर्षांइतक्या जुन्या संस्कृतीचा उल्लेख करताना हसबोले म्हणाले की, संकटांचा सामना करत देश प्रत्येक वेळी अधिक मजबूत होऊन बाहेर पडला आहे. भारताची वाढ किंवा प्रगती ही कोणावर वर्चस्व गाजवण्यासाठी, कोणाचे शोषण करण्यासाठी किंवा जगाला दाबण्यासाठी नसून मानवतेची सेवा करण्यासाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
संघाच्या कार्यक्रमात बोलताना हसबोले यांनी जातिभेद आणि अस्पृश्यतेवर कडक शब्दांत भाष्य केले. जात-पात आणि अस्पृश्यता हा हिंदू समाजावरील एक "कलंक" असल्याचे सांगत त्यांनी हा कलंक मिटवण्याचे आवाहन केले. मानवांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव असता कामा नये. जन्मावर आधारित भेदभाव हा हिंदू संस्कृतीचा भाग नाही, असे त्यांनी नमूद केले.
रामायणात भगवान रामाने शबरीची बोरे खाल्ल्याचा दाखला देत त्यांनी जातीच्या नावावर भेदभाव कसा केला जाऊ शकतो, असा सवाल केला. जातीभेद केवळ कायद्याने किंवा भाषणांनी संपवता येणार नाही, तर यासाठी वैयक्तिक वर्तनात बदल घडवून आणणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
संकटाच्या काळात समाजाच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, कोरोना महामारी किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संघ स्वयंसेवकांनी मदतकार्य केले आहे, परंतु अशा प्रयत्नांमध्ये संपूर्ण समाजाने पुढे येणे आवश्यक आहे. आसाममधील पुराच्या वेळी तरुण आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
पर्यावरण संरक्षणाबाबत बोलताना केवळ घोषणाबाजी न करता दैनंदिन जीवनात, शाळांमध्ये आणि घरांमध्ये संवर्धनाची सवय लावण्याचे आवाहन त्यांनी केले. भारताची प्रगती ही जगात भौतिक समृद्धी आणि आध्यात्मिक सुख यांचा मेळ कसा घालायचा, याचे उत्तम उदाहरण ठरली पाहिजे, असे हसबोले यांनी सांगितले.