कैरो
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला असून, होर्मुझ सामुद्रधुनीवरील नौकानयनावरून सुरू असलेल्या तणावादरम्यान अमेरिकेने इराणवर सलग १३ व्या रात्री हवाई हल्ले केले आहेत. यमनमधील इराणसमर्थक हूती बंडखोरांनी लाल समुद्रात सौदी अरेबियाच्या दोन तेल टँकरांवर हल्ले केल्याची घोषणा केल्यामुळे हा संघर्ष आणखी विस्तारण्याची शक्यता निर्माण झाली असून जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल १०० डॉलरवर पोहोचले आहेत.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, प्रादेशिक जलमार्गातील व्यावसायिक जहाजांच्या सुरक्षेसाठी आणि इराणची धोका निर्माण करण्याची क्षमता कमी करण्यासाठी हे हल्ले करण्यात आले आहेत. दरम्यान, इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने काश्म, बंदर अब्बास आणि आंदिमेस्क परिसरात झालेल्या स्फोटांचे वृत्त दिले असून यात काही जण जखमी झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हूती बंडखोरांच्या हल्ल्यांवर तीव्र संताप व्यक्त करत, ते इराणचे प्रॉक्सी असल्यामुळे मोठ्या लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे.
या वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीत ६ टक्क्यांहून अधिक वाढ होऊन ते प्रति बॅरल सुमारे १०० डॉलरवर पोहोचले आहेत. हा गेल्या मे महिन्यातील उच्चांक आहे. दरम्यान, इराण आणि अमेरिकेचे संबंध सुधारण्यासाठी इराकचे पंतप्रधान अली अल-झैदी तेहरानच्या दौऱ्यावर असून त्यांनी शांततेचे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनीही या वाढत्या संघर्षावर चिंता व्यक्त करत मुत्सद्देगिरी हाच एकमेव पर्याय असल्याचे म्हटले आहे. इराणच्या आरोग्य मंत्रालयाच्या मते, २७ जूनपासून सुरू झालेल्या या नवीन हवाई हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ५५ जणांचा मृत्यू झाला आहे.