INDIA-FRANCE RELATIONS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पॅरिसमधील स्वामीनारायण मंदिराचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 41 m ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

 

नवी दिल्ली 

भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय संबंध सध्या नव्या उंचीवर पोहोचले असून, ही धोरणात्मक भागीदारी दीर्घकाळ चाललेल्या सांस्कृतिक आणि राजकीय संबंधांच्या भक्कम पायावर उभी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. पॅरिस येथे BAPS स्वामीनारायण मंदिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हर्च्युअल पद्धतीने) बोलत होते. हे भव्य मंदिर दोन्ही देशांमधील सहकार्य आणि संधींचे प्रतीक म्हणून शतकानुशतके उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या काही वर्षांत भारत आणि फ्रान्समधील संबंधांनी नवी शिखरे सर केली आहेत. माझे मित्र राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रां यांच्यासह दोन्ही देश एका विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारीच्या दिशेने काम करत आहेत. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), संरक्षण क्षेत्रापासून ते अंतराळ आणि हवामान बदलाच्या मुद्यांपर्यंत भारत आणि फ्रान्स नवीन ऊर्जा आणि गतीने एकत्र पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आपण २०२६ हे वर्ष 'भारत-फ्रान्स नवोपक्रमाचे वर्ष' (Year of Innovation) म्हणूनही साजरी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दुवे

पंतप्रधानांनी भारत आणि फ्रान्समधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवर प्रकाश टाकताना फ्रान्समध्ये भारतीय सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण केले. तसेच फ्रेंच विद्वानांचे संस्कृत भाषेच्या प्रसारातील योगदान आणि स्वामी विवेकानंदांसोबतच्या आध्यात्मिक संबंधांचा उल्लेख केला. पॅरिसहून श्री अरबिंदो आश्रमात आलेल्या 'द मदर' यांच्या अध्यात्मिक प्रवासाने दोन्ही देशांच्या नागरिकांना जोडले असल्याचे ते म्हणाले.

पॅरिसमधील हे स्वामीनारायण मंदिर 'मेड इन इंडिया' आणि 'बिल्ट इन फ्रान्स' असल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले की, या मंदिराचे अनेक दगड भारतात कोरले गेले आहेत, जे भारताची प्राचीन शिल्पकला आणि फ्रान्सची आधुनिक अभियांत्रिकी यांचा सुरेख संगम घडवतात. हे मंदिर फ्रान्सच्या विविधतेला समृद्ध करण्यासोबतच दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंधांना अधिक ऊर्जा देईल, असे विश्वास त्यांनी व्यक्त केला.