नवी दिल्ली
पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारकडून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आपले २६ दिवसांचे आमरण उपोषण समाप्त केले आहे. गुरुवारी मध्यरात्री गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेन्द्र सिंह यांनी भेट घेत सरकारची आश्वासने दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली.
वांगचुक यांनी एक्स (X) वर पोस्ट करत सांगितले की, केंद्रीय मंत्री आणि लेह-लडाख अपेक्स बॉडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मी २६ दिवसांनंतर माझे उपोषण सोडले आहे. उपोषण सोडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, सोनमजींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दैनंदिन आहार घेत लवकरात लवकर वजन पूर्ववत करावे, असे आवाहन केले आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
मेदांता रुग्णालयात पत्नी गीतांजली अँगमो आणि इतरांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी वांगचुक यांना सरकारची भूमिका स्पष्ट केली. दिल्लीतील जंतरमंतरवर आणि २० जुलै रोजी संसदेवर काढण्यात आलेल्या मार्चमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल केले जाणार नाहीत, यावर सरकार सकारात्मक आहे, असे नड्डा यांनी सांगितले. तसेच परीक्षांमधील पेपर लीक आणि शिक्षण सुधारणांवर संसदेत चर्चा करण्याचे आश्वासनही सरकारने दिले आहे.
दरम्यान, सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्याबद्दल 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) ने समाधान व्यक्त केले आहे. मात्र, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत जंतरमंतरवरील आमचे शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहील, अशी स्पष्ट भूमिका CJP ने घेतली आहे. CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांनी वांगचुक यांच्या धैर्याचे कौतुक केले. परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता, शिक्षण प्रणालीतील सुधारणा, नीट पेपर लीकमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची भरपाई आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी CJP कडून अजूनही कायम आहे.