मुंबई
नीट परीक्षेतील अनियमितता आणि पेपर लीक प्रकरणाविरोधात देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता बॉलिवूड आणि कलाविश्वातून मोठा पाठिंबा मिळाला आहे. नसीरुद्दीन शाह, दिग्दर्शक पा. रंजीत, गायक अरजित सिंग, राजकुमार राव, प्रीती झिंटा आणि अनुपम खेर यांच्यासह अनेक नामवंत कलाकारांनी विद्यार्थ्यांच्या या लढ्याशी आणि त्यांच्या मागण्यांशी सहमती दर्शवली आहे.
ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. विद्यार्थ्यांनी दाखवलेले धैर्य कौतुकास्पद असल्याचे सांगत, "सब याद रखा जायेगा" (सर्व काही लक्षात ठेवले जाईल) असा इशारा त्यांनी सरकार दिला आहे. त्यांची पत्नी आणि अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनीही विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची घोषणा केली आहे.
गायक अरजित सिंग यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. दाक्षिणात्य दिग्दर्शक पा. रंजीत यांनी हा लढा सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेतील अपयशाविरोधातील असल्याचे म्हटले आहे. याशिवाय अभिनेत्री स्वरा भास्कर, प्रतिभाव रांटा, अमोल पराशर आणि तोविने थॉमस यांनीही विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाचे समर्थन केले आहे.
दुसरीकडे, अभिनेता राजकुमार राव, प्रीती झिंटा आणि अनुपम खेर यांनी विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण मार्गाने आपला लढा सुरू ठेवावा आणि आंदोलनाचे हिंसक किंवा राजकीयकरण होऊ देऊ नये, असे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि शिक्षणातील सुधारणांसाठी हा लढा महत्त्वाचा असल्याचे कलाकारांनी स्पष्ट केले आहे.