Pakistan Helicopter Crash : पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
मुझफ्फराबादजवळ कोसळलेले पाकिस्तानी विमान
मुझफ्फराबादजवळ कोसळलेले पाकिस्तानी विमान

 

पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) मुझफ्फराबादजवळ बुधवारी पाकिस्तान लष्कराचे एक एमआय-१७ (Mi-17) हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. या भीषण अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व लष्करी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पाकिस्तान लष्कराने अधिकृतपणे दिली आहे. 

पाकिस्तान लष्कराची माध्यम शाखा असलेल्या इंटर-सर्विसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने या दुर्घटनेला दुजोरा दिला असून अपघातात कोणीही जिवंत वाचले नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये एकूण किती जण स्वार होते, याची अचूक संख्या लष्कराकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

लष्कराने जारी केलेल्या एका संक्षिप्त निवेदनात म्हटले आहे की, मुझफ्फराबाद नजीक उड्डाण करत असतानाच एका तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर मदत आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी रवाना झाली. हेलिकॉप्टर कोसळल्याचे समजताच स्थानिक प्रशासनानेही बचाव कार्यात मदत केली. हा अपघात नेमका कोणत्या तांत्रिक कारणांमुळे झाला, याचा अचूक शोध घेण्यासाठी लष्कराकडून एका चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे.

पाकिस्तानातील लष्करी हेलिकॉप्टर अपघातांची मालिका
या भीषण अपघातानंतर पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली जरदारी, पंतप्रधान शाहबाझ शरीफ आणि नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक यांनी तीव्र दुःख आणि शोक व्यक्त केला आहे. त्यांनी वेगवेगळ्या निवेदनांद्वारे अपघातात जीव गमावलेल्या जवानांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

पाकिस्तानचे चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस आणि लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्यासह लष्कराच्या सर्व श्रेणीतील अधिकाऱ्यांनी या मौल्यवान जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून शोकाकुल परिवाराला पाठिंबा दर्शवला आहे.

पाकिस्तानमध्ये लष्करी आणि सरकारी हेलिकॉप्टर कोसळण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही काळापासून सातत्याने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात गिलगिट-बाल्टिस्तानमधील दियामेर जिल्ह्यात लष्कराचे एक हेलिकॉप्टर कोसळले होते, ज्यामध्ये पाच जवानांना आपला जीव गवावा लागला होता. तर त्यापूर्वी ऑगस्ट २०२५ मध्ये खैबर पख्तुनख्वा प्रांतातील मोहमंद जिल्ह्यात खराब हवामानामुळे प्रांतिक सरकारचे हेलिकॉप्टर कोसळले होते. 

त्या दुर्घटनेत दोन्ही पायलटसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा मुझफ्फराबादमधील अपघाताने पाकिस्तान लष्कराच्या हवाई सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.