मनिलेतील आसियान परिषदेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची द्विपक्षीय भेट
भारत आणि चीनमधील संवेदनशील मुद्दे योग्य पद्धतीने हाताळण्यास चीन पूर्णपणे तयार आहे. तसेच दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमधील सकारात्मक गती मजबूत करण्यासाठी काम करण्याची चीनची इच्छा आहे, असे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी बुधवारी सांगितले.
मशिला येथे आयोजित आसियान परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत वांग यी यांनी चीनची भूमिका स्पष्ट केली. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये झालेल्या महत्त्वाच्या सहमतीची अंमलबजावणी करण्यासाठी चीन भारतासोबत काम करण्यास उत्सुक आहे.
उच्चस्तरीय संवाद सातत्याने सुरू ठेवणे, अर्थव्यवस्था, व्यापार, प्रसारमाध्यम तसेच सांस्कृतिक आणि वैयक्तिक पातळीवरील देवाणघेवाण या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवणे यासाठी चीन तयार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांमधील नाजूक आणि संवेदनशील मुद्दे योग्य मार्गाने सोडवण्यास चीन कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.
दोन्ही देशांनी मानवतेचे कल्याण लक्षात ठेवावे, असे आवाहन करत वांग यी म्हणाले, "भारत आणि चीनने मोठ्या देशांना शोभेल अशी जबाबदारी दाखवली पाहिजे. द्विपक्षीय संबंधांमधील सकारात्मक गती कायम ठेवत आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक घडामोडींमध्ये परस्पर समन्वय आणि सहकार्य वाढवले पाहिजे."
आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये बहुधुरवीय व्यवस्था आणि अधिक लोकशाही आणण्यासाठी दोन्ही देशांनी सकारात्मक योगदान द्यावे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
ब्रिक्स चौकटीअंतर्गत परस्पर समन्वय आणि सहकार्य अधिक मजबूत करण्याचे आवाहन वांग यी यांनी केले. विकसनशील देशांच्या सामायिक हितांचे अधिक चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र काम केले पाहिजे, असे ते म्हणाले.
या वर्षी भारतात होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी चीन भारताला पूर्ण पाठिंबा देत राहील, असे वांग यी यांनी म्हटल्याचे चीनच्या शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने नमूद केले आहे.
वांग यी आणि एस. जयशंकर हे दोघेही 'एसोसिएशन ऑफ साउथईस्ट एशियन नेशन्स' (आसियान) शी संबंधित बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी मनिलेमध्ये उपस्थित आहेत.
भारत या वर्षी सप्टेंबर महिन्यात नवी दिल्ली येथे ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. सुरुवातीला ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ५ देशांचा समावेश असलेला हा गट आता अधिक विस्तारला आहे. यामध्ये आता इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा नव्याने समावेश झाला आहे.