जम्मू
खराब हवामानामुळे सलग सहा दिवस स्थगित राहिलेली वार्षिक अमरनाथ यात्रा शनिवारी जम्मू येथून पुन्हा सुरू झाली. सुधारित हवामानाची नोंद झाल्यानंतर ६ हजारांहून अधिक भाविकांचा नवीन जत्था भगवती नगर बेस कॅम्पवरून काश्मीर खोऱ्यातील बाल्टाल बेस कॅम्पसाठी कडेकोट सुरक्षेत रवाना करण्यात आला आहे.
गेल्या १९ जुलै रोजी जम्मू आणि काश्मीरमधील सततचा पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. ३,८८० मीटर उंचीवर असलेल्या पवित्र गुफा मंदिरासाठी जाणारे दोन्ही मार्ग - अनंतनाग जिल्ह्यातील पारंपरिक ४८ किलोमीटरचा पहलगाम मार्ग आणि गंदरबल जिल्ह्यातील १४ किलोमीटरचा बाल्टाल मार्ग प्रभावित झाले होते.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ व्या जथ्यात १,४७० महिला, २५ मुले आणि ५४ साधूंसह एकूण ६,२६९ भाविक सामील आहेत. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेखाली २२३ वाहनांच्या ताफ्यातून हा जत्था पहाटे अडीच वाजता बाल्टाल बेस कॅम्पसाठी रवाना झाला. मात्र, पहलगाम मार्गासाठी कोणताही ताफा पाठवण्यात आला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
उधमपूर-रामबन दरम्यान दरडी कोसळल्यामुळे बंद असलेला जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग पूर्ववत झाल्यानंतर ही यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली. २ जुलै रोजी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी अमरनाथ यात्रेच्या पहिल्या जथ्याला हिरवा झेंडा दाखवला होता. यंदाच्या यात्रेत आतापर्यंत जवळपास चार लाख भाविकांनी गुफा मंदिराचे दर्शन घेतले असून, २८ ऑगस्टला रक्षाबंधनादिवशी यात्रेची सांगता होणार आहे.