ब्रसेल्स
युरोपीय युनियनने (EU) डिजिटल स्पर्धा विरोधी (अँटीट्रस्ट) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुगल कंपनीवर तब्बल ८९० दशलक्ष युरो म्हणजेच सुमारे १ अब्ज डॉलरचा दंड ठोठावला आहे. गुगलने आपले सर्च इंजिन आणि गुगल प्ले स्टोअरचा वापर करून ग्राहकांना स्वतःच्या सेवा आणि ॲप्सकडे वळवले, ज्यामुळे स्पर्धकांना नुकसान सहन करावे लागले, असा ठपका युरोपीय आयोगाने ठेवला आहे. सिलिकॉन व्हॅली ते बीजिंगमधील जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांवर वचक ठेवण्यासाठी ब्रसेल्सकडून सुरू असलेल्या कारवाईचा हा नवीन भाग आहे.
युरोपीय आयोगाच्या कार्यकारी उपाध्यक्ष टेरेसा रिबेरा यांनी स्पष्ट केले की, उत्पादने केवळ ती चांगली असल्यामुळे यशस्वी झाली पाहिजेत, कारण ती सर्च इंजिन चालवणाऱ्या कंपनीच्या मालकीची आहेत म्हणून नाही. युनियनच्या मते, ग्राहकांना आणि ॲप डेव्हलपर्सना चांगल्या ऑफर्सबाबत माहिती देण्याचा अधिकार आहे, अगदी ॲप स्टोअर मालकाला त्यात हिस्सा मिळाला नाही तरीही. याआधी गुगलने अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमच्या वर्चस्वामुळे झालेला ४.५ अब्ज डॉलरचा दंड विरोधातील अपीलात गमावला होता.
दुसरीकडे, गुगलचे जागतिक घडामोडींचे अध्यक्ष केन्ट वॉकर यांनी या दंडावर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की, युरोपीय युनियनचा डिजिटल मार्केट्स कायदा गुगलला रिअल-टाइम सर्च फीचर्स काढून टाकण्यास भाग पाडत आहे. यामुळे युरोपीय व्यवसाय आणि ग्राहकांवर नकारात्मक परिणाम होईल, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, युरोपीय आयोगाचे प्रवक्ते थॉमस रेग्नियर यांनी सांगितले की, EU मध्ये व्यवसायांना निष्पक्षपणे स्पर्धा करण्याचा अधिकार असून गेटकिपर्सनी समान संधी सुनिश्चित करणे बंधनकारक आहे.