Jaspal Rana Passes Away : भारताचे दिग्गज नेमबाज आणि मनू भाकरचे प्रशिक्षक जशपाल राणा यांचे हृदयविकाराने निधन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
भारताचे दिग्गज पिस्तूल नेमबाज आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक जशपाल राणा आणि स्टार नेमबाज मनू भाकर
भारताचे दिग्गज पिस्तूल नेमबाज आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक जशपाल राणा आणि स्टार नेमबाज मनू भाकर

 

भारताचे दिग्गज पिस्तूल नेमबाज आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक जशपाल राणा यांचे वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या या अकाली निधनामुळे भारतीय क्रीडा जगतावर, विशेषतः नेमबाजी वर्तुळावर शोककळा पसरली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार नेमबाज मनू भाकरला दोन ऐतिहासिक कांस्यपदके जिंकवून देण्यात जशपाल राणा यांचे योगदान मोलाचे होते. जशपाल यांच्या पश्चात पत्नी रीना राणा, मुलगी देवंशी, मुलगा युवराज, वडील नारायण सिंग राणा आणि भाऊ-बहीण असा परिवार आहे.

प्रकृती खालावल्याने रुग्णालयात अखेरचा श्वास

नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे (NRAI) अध्यक्ष कलिकेश नारायण सिंग देव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जशपाल राणा यांनी गुरुवारी रात्री दिल्लीतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. जर्मनीतील म्युनिक येथे पार पडलेल्या आयएसएसएफ (ISSF) विश्वचषक स्पर्धेतून भारतीय संघासोबत मायदेशी परतत असताना विमानातच त्यांची प्रकृती बिघडली होती. नवी दिल्लीत उतरल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांच्या हृदयातील ब्लॉकेज दूर करण्यासाठी स्टेंट टाकण्यात आला होता. सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले, मात्र नंतर ती खालावत गेली. जशपाल राणा हे सध्या भारतीय पिस्तूल नेमबाजांचे हाय-परफॉर्मन्स प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते.

नेमबाजी कारकीर्द आणि ऐतिहासिक सुवर्णपदके

आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि खेळाप्रती असलेल्या अफाट आवडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जशपाल राणा यांनी वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी पहिले राष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले होते. १९९४ च्या राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांमध्ये २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा डंका वाजवला. २००६ च्या आशियाई खेळांमध्ये त्यांनी ३ सुवर्ण आणि १ रौप्य पदक जिंकून तत्कालीन जागतिक विकाराची बरोबरी केली होती. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी २०१२ पासून कनिष्ठ राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आणि सौरभ चौधरी, अनिश भानवाला, चिंकी यादव यांसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेमबाज देशाला दिले. त्यांच्या याच अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारने २०२० मध्ये त्यांना प्रतिष्ठित 'द्रोणाचार्य पुरस्कारा'ने सन्मानित केले होते.