US Iran War : अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपणार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले संकेत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपवण्यासाठीचा शांतता करार आता अंतिम टप्प्यात आला असून, चालू वीकेंडला युरोपमध्ये या करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. इराणच्या तेल उद्योगावर नियंत्रण मिळवण्याची धमकी दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच ट्रम्प यांनी इस्लामिक रिपब्लिकवरील प्रस्तावित लष्करी हल्ले मागे घेतले आहेत.

गुरुवारी दुपारी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हॅन्स या स्वाक्षरी समारंभाला उपस्थित राहण्याची शक्यता असून हा सोहळा याच वीकेंडला युरोपमध्ये पार पडू शकतो. या वाटाघाटींच्या ताज्या फेरीबाबत आपण कतार, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत आणि पाकिस्तानसह मध्य पूर्वेतील देशांच्या नेत्यांशी चर्चा केली असल्याचेही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले.

इराण अण्वस्त्रे बनवणार नाही; ट्रम्प यांचा दावा
त्यानंतर जॉर्जियाचे लेफ्टनंट गव्हर्नर बर्ट जोन्स यांच्या प्रचारार्थ आयोजित एका टेलि-रॅलीला संबोधित करताना ट्रम्प यांनी थेट घोषणा केली की अमेरिकेने इराणसोबतचे युद्ध संपवले आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही इराणसोबतचे युद्ध संपवले आहे. इराण कधीही अण्वस्त्रे तयार करणार नाही या आमच्या अटीवर त्यांनी सहमती दर्शवली आहे, हाच या संपूर्ण प्रक्रियेचा मुख्य उद्देश होता, असे ट्रम्प यांनी सांगितले.

ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांनी नमूद केले की, शेअर बाजारानेही या कराराचे स्वागत केले असून लवकरच अधिकृत स्वाक्षरी होईल. हा करार अंतिम झाल्यानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सागरी मार्ग पुन्हा खुला केला जाईल. हा एक अत्यंत मजबूत आणि सविस्तर सामंजस्य करार असल्याचे सांगत ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, इराणने अण्वस्त्रे मिळवण्याचे सर्व प्रयत्न कायमचे सोडून देण्याचे मान्य केले आहे. ते कोणत्याही स्वरूपात अण्वस्त्रांची खरेदी किंवा विकास करणार नाहीत. इराणने आतापर्यंत मोठा फटका सहन केला असून, माझ्यापेक्षा त्यांनाच या कराराची जास्त गरज होती, असे ट्रम्प यांनी इराणच्या भूमिकेविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

हल्ल्याची धमकी 
यापूर्वी गुरुवारी सकाळी ट्रम्प यांनी इराणवर अत्यंत तीव्र हल्ला करण्याची आणि इराणचे मुख्य तेल निर्यात केंद्र असलेल्या 'खार्ग बेटा'वर ताबा मिळवण्याची खुली धमकी दिली होती. मात्र, त्यानंतर अवघ्या काही तासांतच शांतता वाटाघाटींमध्ये प्रगती झाल्याचा दावा करत त्यांनी लष्करी हल्ले अचानक रद्द केले. 

पॅसिफिक महासागरातील संरक्षित क्षेत्रांमध्ये व्यावसायिक मासेमारी पुन्हा सुरू करण्याची घोषणा करण्यासाठी आयोजित एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी या कराराबाबतचे वक्तव्य केले. गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका आणि इराण कराराच्या अगदी जवळ असल्याचे ट्रम्प वारंवार सांगत होते, मात्र अधिकृत कराराने हुलकावणी दिली होती.