भारताच्या युवा वेटलिफ्टर्सची सुवर्णपदकांना गवसणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

समोआतील अपिया येथे राष्ट्रकुल युवा आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप सुरू आहे. यासोबतच युनिव्हर्सल कप (वरिष्ठ) स्पर्धाही पार पडत आहे. या स्पर्धांच्या दुसऱ्या दिवशी भारतीय वेटलिफ्टर्सनी उत्कृष्ट कामगिरी करत चार सुवर्णपदके जिंकली.

पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात सुनील सिंगने एकूण २७१ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. त्याने स्नॅचमध्ये १२६ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १४५ किलो वजन उचलले. महिलांच्या ५८ किलो वजनी गटात आयसांगफा गोगोईने अव्वल स्थान मिळवले. तिने एकूण १८५ किलो वजन उचलले. यात स्नॅचमध्ये ७९ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १०६ किलो वजनाचा समावेश होता.

पुरुषांच्या ७१ किलो गटात अभिनोब गोगोईनेही सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याने एकूण २८४ किलो (स्नॅचमध्ये १२९ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १५५ किलो) वजन उचलून प्रथम क्रमांक पटकावला.

युनिव्हर्सल कप स्पर्धेत अरुणाचल प्रदेशच्या चारू पेसीने पुरुषांच्या ६५ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. त्याने एकूण २८९ किलो वजन उचलण्याची चमकदार कामगिरी केली. त्याने स्नॅचमध्ये १२७ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १६२ किलो वजन उचलले.

भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे (IWF) अध्यक्ष सहदेव यादव यांनी या यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन केले.

"ही कामगिरी आपल्या खेळाडूंच्या आणि सपोर्ट टीमच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे. जागतिक वेटलिफ्टिंगच्या मंचावर भारत एक प्रबळ दावेदार म्हणून वेगाने पुढे येत आहे," असा संदेश यादव यांनी दिला.