कठोर प्रशिक्षण पूर्ण करून ९ महिला कॅडेट्स लष्करात नियमित अधिकारी म्हणून रुजू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
डेहराडून येथील आयएमए (IMA) मध्ये पासिंग आऊट परेडनंतर महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीसोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
डेहराडून येथील आयएमए (IMA) मध्ये पासिंग आऊट परेडनंतर महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीसोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

 

आशा खोसा

भारतीय लष्करासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. उत्तराखंडमधील डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीत (आयएमए) 'पासिंग आऊट परेड' पार पडली. यात नऊ महिलांनी सहभाग घेतला. या महिलांनी त्यांचा १८ महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. आता त्या लष्करात नियमित अधिकारी म्हणून रुजू होत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या समारंभाला उपस्थित आहेत.

या महिला 'आयएमए'च्या १५८ व्या रेग्युलर कोर्स आणि १४१ व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्सच्या विद्यार्थिनी आहेत.

आतापर्यंत महिला चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय लष्करात 'शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी' म्हणून रुजू होत असत. लष्करातील महिलांचा सहभाग मर्यादित ठेवण्याच्या सरकारी धोरणाला सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले. तसेच महिलांना लष्करात नियमित अधिकारी म्हणून सामावून घेण्याचे निर्देश दिले.

'आयएमए'मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या महिला अधिकारी कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीच्या नियुक्तीनिमित्त हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याला 'स्प्रिंग टर्म २०२६ पासिंग आऊट परेड' असं नाव देण्यात आलं आहे.

जुलै २०२५ मध्ये या नऊ महिला अधिकारी कॅडेट्स अकादमीत दाखल झाल्या. त्यांनी आपलं प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. या प्रतिष्ठित समारंभात त्या पुरुष सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून संचलन करत आहेत. त्यांची ही नियुक्ती सशस्त्र दलांमधील महिलांच्या वाढत्या भूमिकेचे दर्शन घडवतं. लष्करी नेतृत्वात महिलांना सामावून घेण्याच्या दिशेने टाकलेलं हे आणखी एक मोठं पाऊल आहे.

परेडला उपस्थित असलेल्या राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, "नऊ महिला कॅडेट्सना पाहून मला विशेष आनंद होत आहे. आयएमएच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण आहे. भारताच्या संरक्षण दलाच्या इतिहासातील हा मैलाचा दगड आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचं हे उदाहरण आहे. भविष्यात आणखी अनेक महिला कॅडेट्स या अकादमीत सामील होतील, याची मला खात्री आहे."

अकादमीचं कौतुक करताना मुर्मू पुढे म्हणाल्या, "ही अकादमी सन्मान, धैर्य आणि निस्वार्थ सेवेचं प्रतीक आहे. आपल्या सीमेचं रक्षण करणारे अनेक असामान्य लष्करी नेते या अकादमीतून घडले आहेत. या प्रतिष्ठित संस्थेशी जोडल्या गेलेल्या सर्वांचं मी या निमित्ताने कौतुक करते."

राष्ट्रपती पुढे म्हणाल्या, "लवकरच आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या अधिकारी कॅडेट्सना समोर पाहून मला आनंद होत आहे. त्यांचं धैर्य आणि शहाणपण हीच त्यांची ताकद असेल."

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हेदेखील या प्रसंगी उपस्थित होते. ऐतिहासिक 'चेटवूड बिल्डिंग ड्रिल स्क्वेअर'मध्ये ही परेड आयोजित करण्यात आली.

परेड पूर्ण झाल्यानंतर नऊ महिला कॅडेट्ससह एकूण ५१५ जंटलमन आणि लेडी कॅडेट्स भारतीय लष्करात रुजू होतील. या तुकडीत १६ मित्र राष्ट्रांच्या ३४ अधिकारी कॅडेट्सचाही समावेश आहे. ते आपापल्या देशांच्या सशस्त्र दलांमध्ये सामील होतील.

यंदाच्या परेडला विशेष महत्त्व आहे. इंडियन मिलिटरी अकादमीच्या ९४ वर्षांच्या इतिहासातील हा ऐतिहासिक टप्पा आहे. पहिल्यांदाच महिला अधिकारी कॅडेट्सची एक तुकडी 'आयएमए'मधून पदवीधर होत आहे आणि भारतीय लष्करात अधिकारी म्हणून रुजू होणार आहे.

प्रत्येक अधिकारी कॅडेटसाठी 'पासिंग आऊट परेड' म्हणजे अनेक महिने आणि वर्षांच्या कठोर लष्करी प्रशिक्षणाचं फळ असतं. भारतीय लष्करात अधिकारी म्हणून नियुक्त होण्याचा तो अभिमानाचा आणि भाग्याचा क्षण असतो.

१९३२ पासून लष्करी नेते घडवणाऱ्या 'आयएमए'साठी हा खरोखरच ऐतिहासिक टप्पा आहे.

इंडियन मिलिटरी अकादमीची स्थापना १ ऑक्टोबर १९३२ रोजी झाली. स्थापनेपासून आतापर्यंत ३४ मित्र देशांच्या कॅडेट्ससह ६५,००० हून अधिक कॅडेट्स या संस्थेतून पास आऊट झाले आहेत.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter