Australian Open 2026 : पी. व्ही. सिंधूची उपांत्य फेरीत धडक; चिनी तैपेईच्या खेळाडूचा एकतर्फी पराभव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
पी. व्ही. सिंधू
पी. व्ही. सिंधू

 

भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. शुक्रवारी झालेल्या एकतर्फी उपांत्यपूर्व फेरीत तिने चिनी तैपेईच्या चेन सू यू हिचा अवघ्या २७ मिनिटांत पराभव केला.

सिंधूची जपानच्या यामागुचीशी होणार लढत

तिसऱ्या मानांकित सिंधूने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखले. तिने २१-६, २१-९ अशा फरकाने थेट सेटमध्ये विजय मिळवला. उपांत्य फेरीत आता माजी जगज्जेत्या सिंधूचा सामना जपानच्या अव्वल मानांकित अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. विशेष म्हणजे, जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या यामागुचीविरुद्ध सिंधूचा 'हेड-टू-हेड' रेकॉर्ड १५-१३ असा थोडा वरचढ आहे. या मोसमात सिंधूला लयीत खेळता आलेले नाही, त्यामुळे डिसेंबर २०२४ मध्ये सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर ती आपल्या पहिल्या विजेतेपदाच्या शोधात आहे.

तन्वी शर्मा आणि पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टात

भारताची युवा खेळाडू तन्वी शर्मा हिची ऑस्ट्रेलियन ओपनमधील शानदार वाटचाल संपुष्टात आली आहे. जपानच्या अकाने यामागुचीने ३२ मिनिटे चाललेल्या सामन्यात तन्वीचा २१-१४, २१-१४ असा पराभव केला.

दुसरीकडे, पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या हरिहरन अमसकरुणन आणि एम. आर. अर्जुन या जोडीला उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. चिनी तैपेईच्या चेन चेंग कुआन आणि लिऊ कुआंग हेंग यांच्याविरुद्ध १९-२१, ९-१६ अशा पिछाडीवर असताना भारतीय जोडीने सामन्यातून माघार घेतली.