न्यूयॉर्क
स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या १३५ व्या पदवीदान समारंभात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना, एका गटाने वॉकआऊट करून आपला निषेध नोंदवला आहे. पॅलेस्टाईनच्या समर्थनात आणि इस्रायल सरकारसोबत असलेल्या गुगलच्या कथित कराराच्या विरोधात या विद्यार्थ्यांनी ही निदर्शने केली.
सुंदर पिचाई हे स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून, त्यांना यावर्षीच्या दीक्षांत समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले होते. पिचाई आपले भाषण सुरू करणार असतानाच, सुमारे २०० विद्यार्थ्यांनी पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवत आणि घोषणाबाजी करत सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 'स्टुडंट्स फॉर जस्टिस इन पॅलेस्टाईन' आणि 'नो टेक फॉर अपार्थीड' यांसारख्या गटांनी हा निषेध आयोजित केला होता. गुगलचा इस्रायल सरकारसोबत असलेला १.२ अब्ज डॉलर्सचा 'प्रोजेक्ट निंबस' (Project Nimbus) हा क्लाउड-कंप्युटिंग करार त्यांना मान्य नसल्याचे या विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.
निषेधाकडे दुर्लक्ष करत सुंदर पिचाई यांनी आपल्या भाषणात चेन्नई ते कॅलिफोर्निया या आपल्या प्रेरणादायी प्रवासावर आणि आयुष्यातील धड्यांवर भाष्य केले. "आपण कोणत्या वातावरणात पदवी घेतो हे हे आपल्या हातात नाही, पण आपण परिस्थितीला कसे सामोरे जातो, हे नक्कीच आपल्या हातात असते" असे पिचाई यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले. वडिलांनी वर्षभराचा पगार खर्च करून स्टॅनफोर्डसाठी विमान तिकीट काढल्याची आठवण सांगताना ते भावूक झाले होते. पीएचडी सोडून करिअरच्या वाटेवर वळताना आलेल्या आव्हानांबद्दलही त्यांनी मनमोकळेपणाने चर्चा केली.
या प्रकारानंतर भारतीय-अमेरिकन गुंतवणूकदार विनोद खोसला यांनी विद्यार्थ्यांच्या वर्तनावर टीका करत याला 'मूर्खपणा' आणि 'स्वार्थीपणा' असल्याचे म्हटले. मात्र, भारतीय-अमेरिकन खासदार रो खन्ना यांनी विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि अधिकाराचा बचाव केला. गेल्या तीन वर्षांपासून स्टॅनफोर्डच्या पदवीदान समारंभात इस्रायल-गाझा युद्धाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची निदर्शने सातत्याने दिसून येत आहेत.