भारत आणि अमेरिकेत सहकार्य विस्तार; एआय अन् आधुनिक तंत्रज्ञानावर होणार करार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण, नागरी अणुऊर्जा आणि एआय तंत्रज्ञान सहकार्यावर चर्चा करणारे अमेरिकन मुत्सद्दी
भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण, नागरी अणुऊर्जा आणि एआय तंत्रज्ञान सहकार्यावर चर्चा करणारे अमेरिकन मुत्सद्दी

 

भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण, नागरी अणुऊर्जा, विश्वासार्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि अर्थव्यवस्था बळकट करणाऱ्या उगवत्या तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याचा विस्तार वेगाने होत आहे, अशी माहिती अमेरिकेचे सहाय्यक परराष्ट्र मंत्री एस. पॉल कपूर यांनी दिली आहे.

हुव्हर इन्स्टिट्यूटमधील बैठकीत महत्त्वपूर्ण भाष्य
हुव्हर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित भारतविषयक गोलमेज परिषदेत कपूर यांनी हे वक्तव्य केले. या बैठकीला अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री कॉंडोलिसा राईस आणि भारतातील अमेरिकेचे माजी राजदूत डेव्हिड सी. मुलफोर्ड उपस्थित होते. या बैठकीबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर माहिती देताना कपूर म्हणाले, "अमेरिकन प्रशासनाच्या नेतृत्वाखाली अमेरिकेचे भारतासोबतचे संबंध दोन्ही देशांत नवीन रोजगार निर्माण करत आहेत. तसेच दोन्ही देशांसाठी आणि संपूर्ण प्रदेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पुरवठा साखळ्यांना (Supply Chains) अधिक मजबूत करत आहेत."

नागरी अणुऊर्जा आणि एआय क्षेत्रातील भागिदारी
कपूर पुढे म्हणाले, "आम्ही संरक्षण आणि नागरी अणुऊर्जा क्षेत्रातील सहकार्य वाढवत आहोत. यामध्ये विश्वासार्ह एआय आणि अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे."

गेल्या वर्षी भारत आणि अमेरिका यांनी जमीन, समुद्र, आकाश, अंतराळ आणि सायबर विश्वात दोन्ही देशांच्या सैन्याची परस्पर कार्यक्षमता वाढवण्यासाठी एका मोठ्या संरक्षण सहकार्य आराखड्यावर स्वाक्षरी केली होती. २००२ पासून भारताने अमेरेककडून अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टर, सी-१७ आणि सी-१३०जे वाहतूक विमाने, पी-८आय सागरी गस्त विमाने आणि एम७७७ हॉवित्झर तोफा यांसारखी महत्त्वाची युद्धसामग्री खरेदी केली आहे.

अमेरिकेतील अणुऊर्जा कंपन्या भारतातील नागरी अणुऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक आणि सहकार्यासाठी उत्सुक आहेत. भारताने नुकताच 'शांती' (SHANTI) कायदा संमत करून दायित्व नियमांमध्ये (liability laws) शिथिलता दिल्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेतील आघाडीच्या अणुऊर्जा क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भारताला भेट देऊन खाजगी क्षेत्रासोबतच्या सहकार्याच्या शक्यता चाचपल्या होत्या.