मस्कत
ओमानच्या किनाऱ्याजवळ तांत्रिक बिघाडामुळे अडकलेल्या भारतीय मालवाहू जहाजावरील ११ खलाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. 'विराट १' (Virat 1) असे या भारतीय ध्वजांकित व्यापारी जहाजाचे नाव असून, इंजिन बंद पडल्याने हे जहाज समुद्रात अडकले होते. सध्या उर्वरित ३ खलाशांना वाचवण्यासाठी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच मस्कत येथील भारतीय दूतावासाने ओमानच्या संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत तातडीने बचाव मोहीम हाती घेतली. दूतावासाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, 'विराट १' जहाजाचे इंजिन बंद पडल्याने खलाशांनी सुरक्षिततेसाठी लाइफ राफ्टचा आधार घेतला होता. आसपासच्या भागातून जाणाऱ्या जहाजांच्या मदतीने या ११ खलाशांना एमव्ही जबल अली ९ (MV Jabal Ali 9) वर सुरक्षित हलवण्यात आले आहे. लवकरच उरलेल्या खलाशांचीही सुटका पूर्ण होईल, असा विश्वास दूतावासाने व्यक्त केला आहे.
ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा ओमानच्या आखातात तणावाचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात याच परिसरात भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या जहाजांवर अमेरिकन लष्कराने हल्ले केले होते, ज्यामध्ये तीन भारतीयांचा मृत्यू झाला होता. या प्राणघातक हल्ल्यांविरुद्ध भारताने अमेरिकेच्या प्रभारी राजदूतांना समन्स बजावून तीव्र निषेधही नोंदवला आहे. अशा संवेदनशील आणि आव्हानात्मक परिस्थितीत भारतीय दूतावासाने ओमान प्रशासनाच्या मदतीने ही बचाव मोहीम यशस्वीपणे राबवली आहे.