मुंबई
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि आमिर खान यांची प्रमुख भूमिका असलेला 'लगान' हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड मानला जातो. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन २५ वर्षे पूर्ण झाली असून, चित्रपटाचे संगीत अजरामर ठरले आहे. या पार्श्वभूमीवर संगीतकार ए. आर. रहमान यांनी एका मुलाखतीत चित्रपटाच्या संगीत निर्मितीचा रंजक प्रवास उलगडला आहे.
ए. आर. रहमान यांच्या कारकिर्दीतील 'लगान' हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. 'स्लमडॉग मिलियनेअर' चित्रपटासाठी दोन ऑस्कर जिंकण्यापूर्वीच 'लगान'च्या संगीत सादरीकरणामुळे त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली. रहमान म्हणाले, "माझ्या पहिल्या चित्रपटापासूनच माझे ध्येय होते की, माझे संगीत जगापर्यंत पोहोचले पाहिजे. साउंड प्रॉडक्शन, शब्द आणि सादरीकरण यावर आम्ही प्रचंड मेहनत घेतली. भारतीय संगीत जागतिक स्तरावर 'कूल' वाटावे आणि जगभरातील रसिकांनी त्याचा आनंद घ्यावा, हाच आमचा मूळ हेतू होता."
'लगान'च्या संगीतासाठी कोणतीही पूर्वकल्पना किंवा साचा नव्हता. आशुतोष गोवारीकर यांच्यासोबतचा हा पहिलाच प्रयोग होता. "आम्ही हे संगीत एकमेकांशी चर्चा करत, नैसर्गिकरीत्या शोधत गेलो. चित्रपटाचा काळ १८९३ चा होता, त्यामुळे आम्ही भुजला जाऊन लोकसंगीतकारांशी संवाद साधला. त्यातील अस्सल लोकसंगीत आणि आधुनिक बास गिटार यांचा मेळ घालून आम्ही हे साउंडस्केप तयार केले," असे रहमान यांनी सांगितले.
'घनण घनण', 'मितवा', 'ओ रे छोरी' आणि 'चले चलो' यांसारखी गाणी कशी आकाराला आली, याचा उलगडाही त्यांनी केला. या गाण्यांसाठी त्यांनी गायक सुखविंदर सिंग, शंकर महादेवन, उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या वैविध्यपूर्ण आवाजाचा कसा वापर केला, हे त्यांनी सांगितले.
दिग्गज कलाकारांसोबतचा प्रवास
'राधा कैसे ना जले' या गाण्यासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव रहमान यांनी अत्यंत अभिमानाने सांगितला. "आशाजींच्या आगमनामुळे गाण्याचे दर्जा उंचावला आणि ते कालातीत झाले," असे ते म्हणाले. तसेच, गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबतच्या सहकार्यामुळे या अल्बममधील शब्द अधिक समृद्ध झाले, असेही रहमान यांनी नमूद केले. आजही 'लगान'चे संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून, भारतीय चित्रपटसंगीताच्या इतिहासातील ते एक अविस्मरणीय पर्व ठरले आहे.