डावीकडून हॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्टोफर नोलन आणि भारतीय चित्रपटसृष्टीचे दिग्गज दिग्दर्शक सत्यजित रे
हॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्टोफर नोलन यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचे दिग्गज दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या 'द अपू ट्रिलॉजी' (The Apu Trilogy) या प्रसिद्ध चित्रपट मालिकेचे मनमोकळेपणाने कौतुक केले आहे. सत्यजित रे हे भारतातील सर्वात महान दिग्दर्शकांपैकी एक असल्याचे नोलन यांनी म्हटले आहे.
'पथेर पांचाली'ने जिंकले नोलन यांचे मन
न्यू यॉर्कमधील 'क्रायटेरियन कलेक्शन'च्या प्रसिद्ध क्रायटेरियन क्लोजेटला दिलेल्या भेटीदरम्यान नोलन यांनी सत्यजित रे यांच्या कामाबद्दल आदर व्यक्त केला. या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये नोलन म्हणाले, "भारतातील सर्वात महान दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या सत्यजित रे यांची 'द अपू ट्रिलॉजी' अप्रतिम आहे. या मालिकेतील पहिला चित्रपट 'पथेर पांचाली' हा खरोखरच अद्भूत आहे. या चित्रपटाने माझे मन जिंकले. मी अजून या ट्रिलॉजीचे दुसरे आणि तिसरे भाग पाहिलेले नाहीत, त्यामुळे ते पाहून ही कथा पूर्ण करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे."
आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित 'द अपू ट्रिलॉजी'
'द अपू ट्रिलॉजी' ही १९५५ मधील 'पथेर पांचाली', १९५६ मधील 'अपराजितो' आणि १९५९ मधील 'अपूर संसार' या तीन चित्रपटांची एक मालिका आहे. ग्रामीण बंगालमधील अपू नावाच्या मुलाच्या बालपणापासून ते प्रौढावस्थेपर्यंतच्या प्रवासाभोवती ही कथा फिरते. या चित्रपट मालिकेला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
'पथेर पांचाली'ला कान चित्रपट महोत्सवात 'बेस्ट ह्यूमन डॉक्युमेंट' पुरस्कार, 'अपराजितो'ला व्हेनिस येथे 'गोल्डन लायन' तर भारताच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले आहे.
दरम्यान, ख्रिस्टोफर नोलन यांचा 'द ऑडिसी' हा नवीन चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, यामध्ये मॅट डॅमन, टॉम हॉलंड, झेंडया, रॉबर्ट पॅटिनसन, लुपिता न्योंगो, ॲन हॅथवे आणि चार्लीज थेरॉन यांसारख्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर ३०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली आहे.