आवाज द व्हॉइस ब्युरो, पुणे
पुण्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित एका भव्य सोहळ्यात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना अमित शहा यांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे स्मरण केले. त्यांनी अजित डोवाल आणि लोकमान्य टिळक यांच्यातील साम्य अधोरेखित केले. ते म्हणाले की, डोवाल यांना ते गुजरातचे गृहमंत्री असल्यापासून ओळखतात आणि ते जन्मापासूनच देशभक्त आहेत. आपल्या ४५ मिनिटांच्या सविस्तर भाषणात शहा यांनी डोवाल यांच्या कार्याचे प्रचंड कौतुक केले. 'तुम्हाला जसा पुरस्कारार्थी म्हणून त्यांची निवड करताना आनंद होतोय, तसाच मला अजित डोवाल यांना पुरस्कार देताना आनंद होतोय,' असे शहा यांनी दोन-तीन वेळा आवर्जून सांगितले. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी पहिली नियुक्ती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांची केली, यावरून त्यांच्या कार्याचे महत्त्व लक्षात येते. डोवाल हे सर्वाधिक काळ या पदावर राहिलेले सल्लागार असून शहा यांनी त्यांच्या शंभर वर्षांच्या दीर्घायुष्याची कामना केली.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर अजित डोवाल यांनी पुणेकर, टिळक स्मारक समिती आणि रोहित टिळक यांचे आभार मानले. पुण्यात सुरुवातीला घालवलेल्या दीड-दोन वर्षांच्या काळातील आठवणींना त्यांनी उजाळा दिला. याच काळात त्यांना लोकमान्य टिळकांच्या कार्याची खरी ओळख झाली आणि ७६ वर्षांनंतर हा पुरस्कार मिळणे हा एक मोठा योगायोग असल्याचे ते म्हणाले. तरुणांना मार्गदर्शन करताना डोवाल यांनी हक्क आणि कर्तव्यांची जाणीव करून दिली. तरुण हक्कांची मागणी करतात, पण त्यांनी आपली कर्तव्येही लक्षात ठेवली पाहिजेत. कर्तव्यांचा गैरवापर झाल्यास ज्यांनी आपल्याला हक्क दिले त्यांना वाईट वाटेल, याची आठवण त्यांनी करून दिली. देश प्रगतीपथावर आहे आणि आपला विकास सर्वांनाच आवडेल असे नाही, त्यामुळे काळजी घेतली पाहिजे. लोकमान्य टिळक जसे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणाले होते, तसेच आता ते असते तर विकसित आणि श्रेष्ठ भारत घडवणे हा माझा हक्क आहे आणि मी ते करणारच असे म्हणाले असते; आपणही तशी प्रतिज्ञा घेऊया, असे आवाहन डोवाल यांनी केले. देशाच्या हितासाठी काम करताना व्हीईटी (VET) म्हणजेच आधी व्हायटल (महत्त्वाचे), मग इसेन्शिअल (आवश्यक) आणि शेवटी डिझायर्ड (इच्छित) असा निकष लावला जातो. यामध्ये देशासाठी जे व्हायटल आहे त्याला सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोवाल यांच्या कार्याचा गौरव केला. 'जेम्स बाँड ही पदवी आता जुनी झाली असून अजित डोवाल हे त्याच्याही पलीकडे जाणारे देशाचे धुरंधर आहेत,' असे शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोवाल यांच्या कारकिर्दीचे कौतुक करताना सांगितले की, त्यांच्या कार्यकाळात देशाला डिफेन्सिव्ह अटॅकिंगचे नवे मेकॅनिझम आणि डॉक्ट्रीन मिळाले. सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी टिळक स्मारक ट्रस्टचे रोहित टिळक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, 'अनेकांना धुरंधर सिनेमानंतर असे वाटले असेल की आम्ही हा निर्णय घेतला, पण अजित डोवाल यांचे कार्य खूप मोठे आहे आणि आम्ही त्यांना खूप आधीपासून ओळखतो. आमचे हे गौरव आहे की आम्ही त्यांना पुरस्कार देतोय. लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी ही अगदी सार्थ निवड आहे आणि त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला याचा आम्हाला खूप आनंद आहे.'