'कॉमेडीने कलावंत म्हणून मर्यादा आणल्या, पण जीवनमान सुधारले'; असं का म्हणले अभिनेता अर्शद वारसी?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 39 m ago
अभिनेता अर्शद वारसी
अभिनेता अर्शद वारसी

 

मुंबई

कॉमेडी चित्रपटांमधील विशिष्ट प्रकारच्या भूमिकांमुळे एक कलावंत म्हणून माझ्यावर मर्यादा आल्या, मात्र याच भूमिकेने माझे जीवन समृद्ध केले, अशी कबुली प्रसिद्ध अभिनेता अर्शद वारसी याने दिली आहे. 'पान सिंग तोमर' फेम दिग्दर्शक तिग्मांशु धुलिया यांच्या 'घमासान' या नव्या चित्रपटात अर्शद वारसी एका डाकूची आव्हानात्मक भूमिका साकारत असून, या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने आपल्या अभिनय प्रवासावर मोकळेपणाने भाष्य केले.

'मुन्ना भाई एम.बी.बी.एस.', 'लगो रहो मुन्ना भाई', 'शहर', 'इश्किया' आणि 'जॉली एलएलबी' यांसारख्या चित्रपटांतील लोकप्रिय भूमिकांसाठी ओळखला जाणारा अर्शद वारसी 'घमासान' या झी५ (ZEE5) वर प्रदर्शित झालेल्या चित्रपटात 'महाराज' नावाच्या शक्तिशाली डाकूच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत प्रतीक गांधी आयपीएस अधिकारी आदित्य सिंग यांच्या भूमिकेत आहे.

कॉमेडीची टॅगिंग आणि कलाकाराचा प्रवास

एका मुलाखतीत बोलताना अर्शद वारसी म्हणाला की, "एका कलाकाराच्या दृष्टीने कॉमेडी भूमिकांनी माझ्यावर काही बंधने आणली. पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात या भूमिकांनी खूप मदत केली. मला मोठी गाडी आणि चांगले घर घेता आले. मी मूळचा कुठून आलोय आणि आज कुठे पोहोचलोय, याचा विचार केला तर मला अपेक्षेपेक्षा जास्त मिळाले आहे. त्यामुळे तक्रार करण्याचे कोणतेही कारण नाही."

कलाकारांना एका विशिष्ट चौकटीत बसवणे ही लोकांची आणि इंडस्ट्रीची सवय असल्याचे त्याने नमूद केले. केवळ कॉमेडीच नाही, तर ॲक्शन स्टार्स किंवा रोमँटिक हिरोंनाही आपली प्रतिमा बदलण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. शाहरूख खानने रोमँटिक भूमिकांमधून ॲक्शनमध्ये येण्यासाठी आणि अक्षय कुमारने ॲक्शनमधून कॉमेडीमध्ये येण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे, असेही अर्शदने स्पष्ट केले.

तिग्मांशु धुलिया यांच्यावरील विश्वास आणि आगामी प्रोजेक्ट्स

१९९६ मध्ये अर्शद वारसीच्या 'तेरे मेरे सपने' या पदार्पणाच्या चित्रपटाचे पटकथा लेखन तिग्मांशु धुलिया यांनी केले होते. धुलिया यांनी नेहमीच माझ्या आतील कलाकाराला ओळखले आहे. अशा प्रकारच्या गंभीर आणि वास्तववादी भूमिका खूप दुर्मिळ असतात आणि दिग्दर्शकाने तुमच्यावर विश्वास दाखवणे हे नशिबाचे लक्षण असते, असे अर्शदने सांगितले.

सध्या अर्शद वारसीच्या हातात अनेक महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आहेत. तो लवकरच शाहरूख खानच्या 'किंग' आणि रोहित शेट्टीच्या 'गोलमाल ५' या मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. जियो स्टुडिओज आणि गोल्डन रेशियो फिल्म्स निर्मित 'घमासान' या चित्रपटात राजपाल यादव आणि इशिता दत्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.



Latest News