श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात विटांच्या भट्टीवर काम करणाऱ्या छत्तीसगडमधील दोन मजुरांच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. दक्षिण काश्मीरमधील केलम परिसरातील विटांच्या भट्टीवर शुक्रवारी उशिरा संध्याकाळी हल्लेखोरांनी मजुरांना लक्ष्य करत गोळीबार केला, असे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात दोन मजूर गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी दीपक रात्रे नावाचा मजूर रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत पावला, तर दुसऱ्या जखमी मजुराला म्हणजेच भूपिंदरला सुरुवातीला अनंतनागच्या जीएमसी आणि नंतर सौरामधील स्किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. हे दोन्ही मजूर विशीतले असून ते छत्तीसगडचे रहिवासी होते.
अनंतनाग शहरात काही दिवसांपूर्वीच एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या झाल्याची घटना घडली होती, त्यानंतर लगेचच हा दहशतवादी हल्ला समोर आला आहे. यापूर्वी श्रीनगरमध्येही २०२४ मध्ये अशाच प्रकारे दोन परप्रांतिय मजुरांची हत्या करण्यात आली होती. ७ फेब्रुवारी २०२४ रोजी श्रीनगरमधील शहीद गंज भागात पंजाबमधील अमृतपाल सिंग आणि रोहित मसिह या दोन मजुरांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले होते. या ताज्या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.