नवी दिल्ली
भारतात बनणाऱ्या सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक असलेल्या 'रामायण' (Ramayana) चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर गुरुवारी प्रदर्शित करण्यात आला. अत्याधुनिक स्पेशल इफेक्ट्स आणि पारंपरिक कथा यांचा अनोखा संगम असलेला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर एक भव्य दृश्यकथा अनुभव देण्याचे आश्वासन देत आहे. चार मिनिटांच्या या ट्रेलरची सुरुवात दाक्षिणात्य सुपरस्टार यश साकारत असलेल्या रावणाच्या भूमिकेने होते, त्यानंतर रणबीर कपूर साकारत असलेल्या रामाच्या भूमिकेची झलक पाहायला मिळते.
सुमारे ४ हजार कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा दोन भागांचा चित्रपट 'दंगल' फेम नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित केला आहे. नमित मल्होत्रांच्या प्राईम फोकस स्टुडिओ आणि ऑस्कर विजेते व्हीएफएक्स स्टुडिओ डीएनईजी यांनी यशच्या मॉन्स्टर माईंड क्रिएशन्सच्या सहकार्याने याची निर्मिती केली आहे. ट्रेलरमध्ये रणबीरचा राम, सई पल्लवीची सीता, रवी दुबेचा लक्ष्मण आणि लारा दत्ताच्या कैकेयी या पात्रांची ओळख करून देण्यात आली आहे. या चित्रपटाचे संगीत ऑस्कर विजेता संगीतकार ए. आर. रहमान आणि हॅन्स झिमर यांनी दिले आहे. 'रामायण: भाग पहिला' जागतिक स्तरावर दिवाळी २०२६ मध्ये रिलीज होणार आहे.