नवी दिल्ली
येत्या २१ जून रोजी होणाऱ्या नीट-यूजी (NEET-UG) फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टेलिग्राम (Telegram) मेसेजिंग ॲपवर तात्पुरती बंदी घातली आहे. परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) केलेल्या शिफारशीनुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही कार्यवाही केली आहे. ही बंदी २२ जूनपर्यंत लागू राहणार आहे.
एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेशी संबंधित अफवा आणि फसवणूक करणाऱ्या रॅकेटला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. टेलिग्रामवर काही वापरकर्ते पेपर फुटीच्या खोट्या अफवा पसरवून उमेदवारांची दिशाभूल करत होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे रोखण्यासाठी आता टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.
केवळ ॲपवर बंदीच नाही, तर टेलिग्रामला ३० जूनपर्यंत मेसेज एडिटिंगचे फिचर भारतात बंद करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. अनेकदा पेपरफुटीचे खोटे पुरावे तयार करण्यासाठी जुन्या मेसेजमध्ये बदल करून ते नंतर फॉरवर्ड केले जातात. ही फसवणूक रोखण्यासाठी हे फिचर तात्पुरते बंद करण्याचे आदेश दिले आहेत. एनटीएने स्पष्ट केले आहे की, नीट-यूजी २०२६ चा पेपर फुटल्याची कोणतीही अधिकृत माहिती नाही आणि व्हायरल होणारे सर्व मेसेज हे केवळ अफवा आहेत.
गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या 'इंडियन सायबर क्राईम को-ऑर्डिनेशन सेंटर'ने राज्य पोलिसांच्या मदतीने आतापर्यंत अनेक बनावट टेलिग्राम चॅनेल्स आणि ग्रुप्सवर कारवाई केली आहे. गुजरात आणि बिहारमधील सायबर गुन्हे शाखेने काही टोळ्यांना अटक केली असून, तपास सुरू आहे. दरम्यान, टेलिग्रामचे सीईओ पावेल डुरोव्ह यांनी या निर्णयावर टीका केली असून, अशा प्रकारे बंदी घालणे हा उपाय नसल्याचे म्हटले आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता ही कारवाई करण्यात आल्याचे एनटीएने सांगितले आहे. नीट-यूजी फेरपरीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार २१ जून रोजीच पार पडणार आहे.