PM MODI FRANCE TOUR: एआय, व्यापार आणि तंत्रज्ञानावर झाली सविस्तर चर्चा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 2 d ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय चर्चा

 

नीस 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्स दौऱ्यावर असून, त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी अत्यंत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा केली आहे. या भेटीदरम्यान भारत आणि फ्रान्स यांच्यातील विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला. एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता), व्यापार, स्टार्टअप्स, पायाभूत सुविधा आणि आरोग्य यांसारख्या विविध क्षेत्रांतील प्रगतीचा यावेळी आढावा घेण्यात आला.

धोरणात्मक भागीदारीला नवी चालना

फ्रान्सच्या नीस या शहरात पंतप्रधान मोदींचे काल रात्री आगमन झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत 'भारत इनोव्हेट्स' (Bharat Innovates) कार्यक्रमाचे उद्घाटन केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी 'एक्स' (X) वर दिलेल्या माहितीनुसार, या चर्चेत नावीन्यपूर्ण संशोधन, व्यापार, गुंतवणूक, शाश्वत विकास, सुरक्षा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीतून एआय, विज्ञान, अंतराळ संशोधन आणि फिनटेक यांसारख्या आधुनिक क्षेत्रांत भारत-फ्रान्स सहकार्याला मोठी चालना मिळणार आहे.

आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर एकमत

या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही नेत्यांनी अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली. भारताच्या धोरणात्मक दृष्टीकोनात फ्रान्सला विशेष स्थान असल्याचे पंतप्रधान मोदींनी दिल्लीतून निघण्यापूर्वीच स्पष्ट केले होते. उभय देशांमधील वाढत्या द्विपक्षीय संबंधांना या भेटीमुळे अधिक गती मिळणार आहे.

फ्रान्सचा हा दौरा पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान मोदी जी-७ (G-7) शिखर परिषदेसाठी रवाना होणार आहेत. या परिषदेदरम्यान त्यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर जागतिक नेत्यांशी महत्त्वपूर्ण भेट होण्याची शक्यता आहे.