Women's T20 World Cup: पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताची विजयी सुरुवात

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 d ago
महिला टी२० विश्वचषक: स्मृती मानधनाचे अर्धशतक
महिला टी२० विश्वचषक: स्मृती मानधनाचे अर्धशतक

 

बर्मिंगहॅम 

महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताने आपल्या मोहिमेची सुरुवात दणदणीत विजयाने केली आहे. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६४ धावांनी पराभव केला. स्मृती मानधनाचे क्लासिक अर्धशतक आणि दीप्ती शर्माची घातक गोलंदाजी या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

मानधना आणि घोष यांची फटकेबाजी

प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात अडखळली होती, मात्र स्मृती मानधनाने संयमी आणि आक्रमक फलंदाजी करत ४४ चेंडूंत ६८ धावांची खेळी केली. तिला कर्णधार हरमनप्रीत कौरने (३६) चांगली साथ दिली. डावाच्या अखेरीस रिचा घोषने अवघ्या १७ चेंडूंत ३४ धावांची झंझावाती खेळी केल्यामुळे भारताला १७० धावांचा पल्ला गाठता आला. पाकिस्तानच्या गोलंदाजांना मानधनाच्या तंत्रशुद्ध फटकेबाजीसमोर हतबल व्हावे लागले.

दीप्ती शर्माचा विक्रम आणि भेदक मारा

भारताने दिलेल्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली. पाकिस्तानचा संघ १७ षटकांत केवळ १०६ धावांत आटोपला. भारताची फिरकीपटू दीप्ती शर्माने केवळ १० धावा देत ५ बळी टिपले आणि टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज होण्याचा मान मिळवला. तिला श्री चरणी (३ बळी) आणि शेफाली वर्मा यांनी उत्तम साथ दिली. पाकिस्तानसाठी मुनीबा अलीने सर्वाधिक ४१ धावा केल्या, परंतु इतर फलंदाजांना भारताच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर तग धरता आला नाही.