कॅन्सस सिटी
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने फिफा विश्वचषक स्पर्धेत एक नवा इतिहास रचला आहे. पाच वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांत गोल करणारा तो जगातील केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे. कन्सस सिटी येथे अल्जेरियाविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात मेस्सीने गोल करत अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
मेस्सीच्या जागतिक कारकिर्दीतील हा १४ वा विश्वचषक गोल आहे. या कामगिरीसह त्याने फ्रान्सचा कायलियन एमबाप्पे आणि पश्चिम जर्मनीचा गर्ड म्युलर यांच्याशी बरोबरी केली आहे. पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो हा पाच विश्वचषकांत गोल करणारा पहिला खेळाडू होता आणि आता मेस्सीने त्याच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. कन्सस सिटीमधील ॲरोहेड स्टेडियमवर मेस्सीने गोल करताच उपस्थित हजारो चाहत्यांनी जल्लोष केला.
विशेष म्हणजे, आजचा सामना हा मेस्सीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २०० वा सामना आहे. बरोबर २० वर्षांपूर्वी, १७ जून २००६ रोजी त्याने विश्वचषकात पदार्पण केले होते. पुढच्या आठवड्यात ३९ वर्षांचा होणारा मेस्सी हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरून या स्पर्धेत सहभागी झाला आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याची चर्चा होती, मात्र आजच्या गोलने त्याने सर्व शंका दूर केल्या आहेत.
मेस्सीच्या या कामगिरीमुळे 'फुटबॉलचा आतापर्यंतचा महान खेळाडू' (GOAT - Greatest of All Time) या वादात त्याचे नाव अधिक ठळकपणे पुढे आले आहे. फुटबॉल विश्वात मेस्सीचे वेड या विश्वचषकातही कायम असल्याचे कन्सस सिटीतील चाहत्यांच्या गर्दीवरून दिसून येत आहे.