T-20 WORLDCUP: स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या धडाकेबाज खेळीने भारताचा नेदरलँड्सवर विजय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 55 m ago
नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांची दमदार खेळी
नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांची दमदार खेळी

 

लीड्स 

स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला टी-२० विश्वचषकात नेदरलँड्सवर ९५ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास अधिक उंचावला असून, आता आगामी सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मानधना-शफालीची तुफानी सुरुवात

नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय सलामीच्या जोडीने याचा पुरेपूर फायदा घेतला. स्मृती मानधनाने ४७ चेंडूत ७४ धावांची तर शफाली वर्माने ३८ चेंडूत ५५ धावांची खेळी करत नेदरलँड्सच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. या दोघांनी ७० चेंडूंमध्ये ११५ धावांची भागिदारी करून भारताला २०९/५ अशा विक्रमी धावसंख्येपर्यंत पोहोचवले. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील ही भारताची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली.

गोलंदाजांचा शिस्तबद्ध मारा

२०९ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ कधीच सावरला नाही. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच नेदरलँड्सवर दबाव निर्माण केला. नंदिनी शर्माने आपल्या विश्वचषक पदार्पणात प्रभावी गोलंदाजी केली, तर दीप्ती शर्मा आणि श्री चरणी यांनी विकेट्स घेत नेदरलँड्सचा डाव ११४ धावांवर गुंडाळला. भारताच्या क्षेत्ररक्षणादरम्यान श्रेयंका पाटीलच्या घोट्याला दुखापत झाल्यामुळे तिला मैदानाबाहेर नेण्यात आले, ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब ठरली.

नेदरलँड्सकडून कर्णधार बाबेट डी लीडने २८ धावांची खेळी केली, मात्र तिला अन्य खेळाडूंची साथ मिळाली नाही. या विजयानंतर भारतीय संघ आता २१ जून रोजी मँचेस्टर येथे होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे.