नवी दिल्ली
नेदरलँड्स आणि बेल्जियम येथे पुढील महिन्यात होणाऱ्या एफआयएच (FIH) हॉकी विश्वचषकात भारतीय पुरुष आणि महिला संघ त्यांच्या पारंपरिक निळ्या रंगाच्या जर्सीऐवजी भगव्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरणार आहेत. हॉकी इंडियाच्या या निर्णयावर अनेक आजी-माजी खेळाडूंनी आक्षेप घेतला असून, तांत्रिक कारणास्तव हा बदल केल्याचे स्पष्टीकरण हॉकी इंडियाने दिले आहे.
हॉकी इंडियाने सोशल मीडियावर नवीन जर्सी अनावरण करताना सांगितले की, निळा रंग आधुनिक निळ्या टर्फ पिंचसोबत मिसळत असल्याने खेळाडूंना पाहण्यात अडचण येत होती. यामुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या सल्ल्यानुसार भगवा रंग निवडण्यात आला आहे. भगवा रंग हा राष्ट्रीय ध्वजाचा एक भाग असून तो शौर्य, त्याग आणि विजयाचे प्रतीक असल्याचे सांगण्यात आले. या जर्सीवर 'मंडाला' प्रेरित पॅटर्न आणि देवनागरी लिपीत 'INDIA' असे लिहिण्यात आले आहे.
या बदलावर तीव्र नाराजी व्यक्त करताना ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता कर्णधार व्ही. बास्करन आणि माजी कर्णधार विरेंन रासकिन्हा यांनी हा निर्णय लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. भारतीय हॉकीची एक स्वतंत्र ओळख निळ्या जर्सीमुळे होती, ती आता पुसली जात असल्याचे बास्करन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, २०१४ च्या विश्वचषकात पिवळी आणि २०१८ च्या विश्वचषकात आकाशी रंगाची जर्सी वापरण्यात आली होती, त्यामुळे रंगात बदल करण्याची ही पहिलीच वेळ नाही, असे स्पष्टीकरण देत हॉकी इंडियाने आपल्या निर्णयाचा बचाव केला आहे.