फरहान इस्रायली
रुबी खान यांच्यासाठी समाजसेवा ही एखादी तात्पुरती दानधर्माची गोष्ट नाही, तर ती एक जीवनशैली आहे. एखादी नैसर्गिक आपत्ती असो, सरकारी योजनांचा लाभ गरिबांपर्यंत पोहोचवणे असो, कौटुंबिक हिंसाचाराने पीडित महिलांचे समुपदेशन असो वा देशभरात हजारो किलोमीटर पायी चालणे असो; त्यांनी नेहमी मैदानात उतरून प्रत्यक्ष काम करण्यास प्राधान्य दिले आहे.
गेल्या दोन दशकांत रुबी खान यांनी मानवाधिकार कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या, माजी मिसेस जयपूर आणि पुरस्कार विजेत्या कार रेसर म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तरीही, तुम्हाला भविष्यात कसे आठवले जावे असे विचारल्यास त्यांचे उत्तर अगदी सोपे असते, 'मी जितक्या लोकांच्या आयुष्याला स्पर्श करू शकले, त्यावरून माझी ओळख राहावी.'
सेवेसाठी आयुष्य समर्पित
केवळ सहानुभूती दाखवून चालत नाही, त्याला कृतीची जोड हवी असा रुबी यांचा ठाम विश्वास आहे. राजस्थानमध्ये जेव्हा जेव्हा एखादे संकट येते, तेव्हा बाधितांपर्यंत पोहोचणाऱ्या पहिल्या व्यक्तींमध्ये त्या असतात. पीडितांना तात्काळ मदत पुरवणे आणि त्यांना हक्काच्या सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हे त्यांचे मुख्य ध्येय असते.
गरजू व्यक्तीला मदत करणे हीच माणसाची सर्वात मोठी आणि अर्थपूर्ण ओळख आहे, असे सोपे तत्त्वज्ञान त्या मानतात. गेल्या जवळपास २० वर्षांपासून हीच भावना त्यांच्या प्रत्येक कामाचे मार्गदर्शक ठरली आहे.
या संपूर्ण प्रवासात त्यांचे पती कॅप्टन मिर्झा बेग यांची त्यांना मोलाची साथ लाभली आहे. राजस्थानचे पहिले मुस्लिम पायलट म्हणून ओळखले जाणारे कॅप्टन बेग हे स्वतःही एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी सुरू केलेल्या अनेक उपक्रमांमध्ये पतीने नेहमीच प्रोत्साहन आणि पाठिंबा दिल्याचे रुबी अभिमानाने सांगतात.
या दोघांनी मिळून वैद्यकीय शिबिरांचे आयोजन, नागरिकांना अधिकृत कागदपत्रे मिळवून देणे, करिअर समुपदेशन, गरजू कुटुंबांना मोफत रेशन वाटप आणि गरीब मुलींच्या विवाहासाठी मदत असे अनेक उपक्रम राबवले आहेत. या कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्यातील हजारो लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचली आहे.
जागरूकतेतूनच सक्षमीकरण
रुबी खान यांच्या मते, वंचित घटकासमोरील सर्वात मोठी अडचण गरिबी नसून माहितीचा अभाव ही आहे. अनेक पात्र कुटुंबे केवळ माहिती नसल्यामुळे सरकारी कल्याणकारी योजनांपासून वंचित राहतात. ही दरी ओळखून त्यांनी लोकांना सरकारी योजनांशी जोडणे, आवश्यक कागदपत्रे मिळवून देणे, आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि प्रशासकीय प्रक्रियेत मदत करण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत.
करिअर मार्गदर्शन हासुद्धा त्यांच्या कामाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. कॅप्टन बेग यांच्यासोबत मिळून त्या बेरोजगार तरुणांचे समुपदेशन करतात. त्यांना रोजगाराच्या संधींची माहिती देतात आणि कौशल्यावर आधारित व्यवसाय सुरू करून स्वावलंबी होण्यास प्रोत्साहित करतात. लोकांना केवळ नोकरी शोधण्यात मदत करणे एवढाच त्यांचा उद्देश नसून, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हा त्यामागील मुख्य हेतू आहे.
संकटग्रस्त महिलांच्या पाठीशी
रुबी खान यांच्या कामाचा मोठा भाग कौटुंबिक हिंसाचार आणि मानसिक छळाचा सामना करणाऱ्या महिलांवर केंद्रित आहे. अनेक महिला असहाय्यतेमुळे आणि कोणताही पर्याय न दिसल्याने अत्याचार सहन करत राहतात, असे त्यांना वाटते. त्यामुळे त्यांची भूमिका केवळ समुपदेशनापुरती मर्यादित राहत नाही. त्या महिलांना मानसिक आधार देतात, गरज भासल्यास कायदेशीर मदत मिळवून देतात आणि त्यांचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात.
त्याच वेळी, त्या निष्पक्षतेवरही विश्वास ठेवतात. जेव्हा पुरुष त्यांच्याकडे येऊन चुकीच्या कायदेशीर प्रकरणात अडकवल्याचा दावा करतात, तेव्हा त्या त्यांनाही योग्य मार्गदर्शन करतात. पूर्वग्रहापेक्षा न्यायाला त्या जास्त महत्त्व देतात. या कार्यात अनेक बिगरसरकारी संस्था (NGOs) त्यांना सहकार्य करतात.
खरे सक्षमीकरण हे आर्थिक स्वातंत्र्यातूनच येते, असा रुबी यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे त्या महिलांना रोजगाराभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण देतात. लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा योग्य नोकरी मिळवण्यासाठी त्या महिलांना मदत करतात.
मेहंदी आर्ट, बँकिंग जनजागृती, डिजिटल मार्केटिंग आणि इतर व्यावसायिक कौशल्यांच्या उपक्रमांद्वारे त्यांनी अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवले आहे. महिलांसाठी त्यांनी विशेष कर्करोग तपासणी शिबिरे आणि आरोग्य जनजागृती कार्यक्रमही आयोजित केले आहेत.
रेसिंग ट्रॅकवर मोडले पारंपारिक नियम
समाजकार्य हे रुबी खान यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक अंग आहे. मोटारस्पोर्ट्सच्या जगातही त्यांनी स्वतःचे वेगळे नाव कमावले आहे. २०१० ते २०१७ दरम्यान त्यांनी 'ब्लेज दे राजस्थान' आणि 'वुमन ऑन व्हील्स' यांसारख्या अनेक प्रतिष्ठित कार रॅली आणि रेसिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यात त्यांनी अनेकदा विजयही मिळवला. त्यांच्या या कामगिरीमुळे राजस्थानमधील तीन सर्वात वेगवान महिला कार रेसरमध्ये त्यांची गणना होते.
रुबी यांच्यासाठी मोटारस्पोर्ट्स ही केवळ एक स्पर्धा नव्हती. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात महिलांनी आत्मविश्वासाने आणि धैर्याने पुढे आले पाहिजे, याचे ते एक प्रतीक होते.
पर्यावरण संवर्धनाचा ध्यास
रुबी यांचे समाजाप्रती असलेले योगदान पर्यावरण संरक्षणापर्यंत पसरलेले आहे. उन्हाळ्यात पक्षांना तीव्र उष्णतेपासून वाचवण्यासाठी त्या जयपूरमध्ये दरवर्षी 'परिंदा अभियान' राबवतात. यात झाडांवर आणि उंच ठिकाणी पाण्याचे घट ठेवले जातात.
लहान मुलांमध्ये पर्यावरणाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी हजारो 'सीड पेन्सिल'चे वाटप केले आहे. पेन्सिल वापरून लहान झाल्यावर, तिच्या टोकाला असलेली बियांची कॅप्सूल मातीत लावून त्यातून रोप तयार होते. ही रोपे यशस्वीपणे जगवणाऱ्या मुलांचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला जातो. यामुळे लहान वयातच मुलांमध्ये पर्यावरणीय जबाबदारीची सवय रुजते. शिक्षक हेच कोणत्याही समाजाचा सर्वात मजबूत पाया असतात, या विश्वासाने दर शिक्षक दिनाला त्या शिक्षकांचा गौरव करतात.
भारत जोडो पदयात्रा
रुबी खान यांच्या प्रवासातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे २०२२ मधील कन्याकुमारी ते श्रीनगर अशी सुमारे ४,००० किलोमीटरची पायी यात्रा. सुमारे १५० दिवस चाललेल्या या यात्रेत त्यांनी १२ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेश पार केले.
या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या त्या राजस्थानमधील एकमेव महिला होत्या. हा बहुमान केवळ स्वतःसाठीच नाही तर संपूर्ण राज्यातील महिलांसाठी अभिमानास्पद असल्याचे त्या मानतात.
ही देशभरात झालेली पदयात्रा काँग्रेस पक्षाने आयोजित केली होती आणि त्याचे नेतृत्व राहुल गांधी करत होते. तरीही, आपला हेतू कधीही राजकीय नव्हता असे रुबी म्हणतात. लोकांना भेटून भारत समजून घेण्याची ही एक उत्तम संधी होती, असा दृष्टिकोन त्यांनी ठेवला.
गावे, शहरे आणि महानगरांमधून चालताना त्या शेतकरी, मजूर, महिला आणि तरुणांशी बोलल्या. प्रत्येकाची एक वेगळी कहाणी त्यांनी जाणून घेतली. भारत केवळ नकाशावर नसून इथल्या लोकांच्या दैनंदिन आयुष्यात वसलेला आहे, हे या प्रवासाने शिकवले असल्याचे त्या सांगतात.
हा प्रवास शारीरिकदृष्ट्या अत्यंत कठीण होता. ट्रकला जोडलेल्या कंटेनरमध्ये राहण्याची सोय होती. कडक उन्हात मैलोन् मैल चालल्यामुळे पायाला फोड आले होते. यात्रेदरम्यान त्यांना दुखापत झाली, ओठावर टाके पडले आणि हाताला फ्रॅक्चरही झाले. तथापि, त्यांनी प्रवास अर्ध्यावर सोडण्यास साफ नकार दिला.
रुबी या कठीण महिन्यांत पती कॅप्टन मिर्झा बेग हे त्यांच्यासाठी सातत्याने प्रेरणेचा स्रोत राहिले. त्यांच्यासाठी ही पदयात्रा केवळ एक शारीरिक आव्हान नव्हते, तर ती सहनशीलता, विविधता आणि मानवी नातेसंबंधांचे धडे देणारी एक मोठी पाठशाळा होती.
कुटुंबाचा सामाजिक वारसा
आपल्या समाजकार्याचे श्रेय रुबी आपल्या कुटुंबाकडून मिळालेल्या संस्कारांना देतात. राजस्थानमधील एक आदरणीय सिव्हिल इंजिनिअर असलेले त्यांचे सासरे मिर्झा मुख्तार बेग यांचा त्या विशेष उल्लेख करतात. त्यांनी आपल्या मुलांना समाजासाठी काम करण्याची प्रेरणा दिली. हा वारसा संपूर्ण कुटुंबाने पुढे चालवला आहे.
कॅप्टन बेग यांचे लहान भाऊ मिर्झा शारिक बेग हेसुद्धा सिव्हिल इंजिनिअर आहेत. जयपूरच्या ऐतिहासिक जलमहलाच्या पुनरुज्जीवनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी या वास्तूचे रूपांतर जयपूरमधील एका प्रसिद्ध पर्यटन स्थळात केले. दुसरे भाऊ मिर्झा साकिब बेग हे वैज्ञानिक संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.
अशा प्रकारे हे संपूर्ण कुटुंब वेगवेगळ्या क्षेत्रांतून समाजसेवेसाठी समर्पित आहे. लेखनातून सामाजिक सलोख्याचा संदेश सामाजिक संवादाचे माध्यम म्हणून रुबी खान यांनी लेखनाचाही प्रभावी वापर केला आहे.
प्राध्यापक के. एल. कमल यांच्या सोबतीने त्यांनी "हिंदू धर्म और इस्लाम: दो आंखें, नई रोशनी" या पुस्तकाचे सह-लेखन केले. धर्माबद्दलचे गैरसमज दूर करणे आणि परस्पर समंजसपणा वाढवणे हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन २०१० मध्ये तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते झाले होते. हे पुस्तक उपराष्ट्रपतींच्या ग्रंथालयात आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठात संग्रहित करण्यात आले आहे.
त्यांनी मुलांसाठी "ज्ञान के बुलबुले" नावाचा एक काव्यसंग्रहही लिहिला आहे. सोप्या भाषेत भारतीय संस्कृती, पर्यावरण जाणीव आणि नैतिक मूल्यांची ओळख मुला करून देणे हा या पुस्तकाचा हेतू आहे.
सौंदर्य स्पर्धेच्या पलीकडचे यश
रुबी यांच्या अनेक यशांपैकी एक म्हणजे २००४ मध्ये त्यांनी जिंकलेला 'मिसेस जयपूर'चा किताब. स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वात जास्त टाळ्या कॅप्टन मिर्झा बेग यांनी वाजवल्या होत्या, अशी आठवण त्या सांगतात. त्या संपूर्ण स्पर्धेत पती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते.
मुस्लिम महिला म्हणून सौंदर्य स्पर्धेत भाग घेताना त्यांना टीकेचा सामना करावा लागला. तरीही, त्यांनी या अनुभवाकडे केवळ मुकुट जिंकण्याची स्पर्धा म्हणून पाहिले नाही. स्वतःचा आत्मविश्वास आणि वेगळेपण व्यक्त करण्याची ती एक संधी मानली.
भविष्याची वाटचाल
रुबी खान आणि कॅप्टन मिर्झा बेग आपल्या सामाजिक उपक्रमांचा विस्तार करत आहेत. तरुण, महिला आणि अल्पसंख्याक समाजासाठी ते नवीन प्रशिक्षण कार्यक्रम, शिष्यवृत्ती शिबिरे आणि जागरूकता अभियान तयार करत आहेत. जयपूरच्या वारशाचे जतन करतानाच, शहरासमोरील सामाजिक आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारी संस्थांसोबत काम करण्याची त्यांची इच्छा आहे.
रेसिंग ट्रॅकपासून ते मदत शिबिरांपर्यंत, वर्गांपासून ते समुपदेशन केंद्रांपर्यंत आणि भारताच्या दक्षिण टोकापासून ते काश्मीरच्या खोऱ्यांपर्यंत; रुबी खान यांचा प्रवास हा प्रसिद्धीपेक्षा ध्येयाने प्रेरित असल्याचे दिसते. त्यांच्यासाठी प्रत्येक यश हे शेवटी एकाच ध्येयाकडे घेऊन जाते: ते म्हणजे लोकांसाठी अनुकंपेने, आदराने आणि निष्ठेने केलेली सेवा!