ग्लासगो
ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल खेळ २०२६ मध्ये भारतीय बॉक्सिंगपटूंनी धमाकेदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. बुधवारी झालेल्या सामन्यांमध्ये आणखी सहा भारतीय मुष्टीयोध्यांनी दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या विजयामुळे भारताची निश्चित झालेली एकूण पदके १० वर पोहोचली असून, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतील एकूण बॉक्सिंग पदकांचा उच्चांक भारताने मागे टाकला आहे.
साक्षी चौधरी (५१ किलो), अरुंधती चौधरी (७० किलो), सचिन सिवाच (६० किलो), अंकुश पांघाल (८० किलो), नरेंद्र बेरवाल (+९० किलो) आणि जागतिक चॅम्पियन जस्मिन लाम्बोरीया (५७ किलो) यांनी आपापल्या गटात विजय मिळवत अंतिम चारमध्ये स्थान मिळवले. यापूर्वी लव्हलिना बोरगोहेन, प्रिया घांघस, प्रीती पवार आणि जादुमणी सिंग यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मागील २०२२ च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने बॉक्सिंगमध्ये एकूण सात पदके जिंकली होती.
साक्षी चौधरीने उत्तर आयर्लंडच्या केटलीन फ्रायर्सचा ५-० असा पराभव केला, तर जागतिक क्रमवारीत ५ व्या क्रमांकावर असलेल्या सचिन सिवाचने बोत्स्वानाच्या ट्रेझर मोरेमीवर एकतर्फी विजय मिळवला. अरुंधती चौधरीला न्यूझीलंडच्या मॉर्गन हेंडरसनविरुद्ध विजयासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली, अखेर तिने ३-१ ने बाजी मारली.
अंकुश पांघालने सेशेल्सच्या जेइड मिकोॅकचा ५-० ने पराभव केला, तर आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेता नरेंद्र बेरवालने अटीतटीच्या लढतीत सामोआच्या मायकेल सेकोचा ३-२ ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दिवसाच्या अखेरच्या लढतीत जस्मिन लाम्बोरीयाने इंग्लंडच्या एलिस ग्लाइनचा ४-१ असा पराभव करत आपली पदक निश्चिती केली.